ग्रामस्थांनी ठोकलेले कुलूप तोडले
By Admin | Updated: November 8, 2015 01:31 IST2015-11-08T01:31:03+5:302015-11-08T01:31:03+5:30
स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत पारित करण्यात आलेल्या विविध ठरावांची अंमलबजावणी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी न केल्यामुळे ....

ग्रामस्थांनी ठोकलेले कुलूप तोडले
इल्लूर येथील प्रकार : स्वातंत्र्य दिनाच्या ठरावावर कार्यवाही न झाल्याने संतप्त; प्रशासनाच्या पुढाकाराने
आष्टी : स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत पारित करण्यात आलेल्या विविध ठरावांची अंमलबजावणी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी न केल्यामुळे संतप्त झालेल्या चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथील ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी ८ वाजता ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले. मात्र काही ग्रा. पं. पदाधिकारी व सचिव यांनी पंचायत समिती व पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पुन्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ग्राम पंचायतीला ठोकलेले कुलूप पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आले.
१५ आॅगस्ट रोजी इल्लूर ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत विविध ठराव पारित करण्यात आले. परंतु दीर्घ कालावधी उलटूनही या ठरावांची अंमलबजावणी ग्राम पंचायतीने केली नाही. त्यानंतर संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २७ आॅक्टोबर रोजी निवेदन देऊन ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी ८ वाजता ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले. सदर बाब ग्राम पंचायतीचे काही पदाधिकारी व सचिव यांना लक्षात येताच त्यांनी आष्टी पोलीस ठाणे व चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेत पोलीस कुमक बोलावून सर्व ग्रा. पं. सदस्यासमक्ष शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता कुलूप तोडले.
ठरावात घेतलेल्या विषय क्रमांक ७ नुसार, अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आली असून विषय क्र. ८ मधील - रंगमंचाला दिलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर रंगमंच’ या नावाला काही ग्रामस्थांचा विरोध होता. त्यामुळे जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले असता, त्यांनी जि. प. अंतर्गत केलेल्या कामांना मान्यवरांचे नाव देता येत नाही, याबाबत जीआर ग्राम पंचायतीला पाठविण्यात आला आहे, असे सांगितले, असे ग्राम पंचायत कमिटीचे मत आहे. तेव्हा ग्राम पंचायतीने मान्यवर व थोर पुरूष यामधील फरक काय, यावर मार्गदर्शन मागितले आहे, असे ग्राम पंचायतीद्वारा सांगण्यात आले आहे.
कुलूप तोडताना संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, विस्तार अधिकारी भोगे, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, पोलीस उपनिरीक्षक नितेश गोहणे, सहाय्यक ुफौजदार संघरक्षित फुलझेले, सरपंच निरंजना मडावी, उपसरपंच रामचंद्र बामणकर, सचिव बारसागडे, ग्राम पंचायत सदस्य व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
या कारणांसाठी ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
स्वातंत्र्यदिनी इल्लूर ग्राम पंचायतीत पारित झालेल्या विषयांमध्ये शिवाजी चौकातील अतिक्रमण हटविणे, स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविणे, नवीन बांधकाम करण्यात आलेल्या रंगमंचास देण्यात आलेले नाव बदलविणे आदींचा समावेश होता. सदर ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राजेंद्र शिवराम पातर, विकास बोरकुटे, बंडू बामणकर, सुरेश शेंडे, शंकर चिताडे, गिरीधर बामणकर, गणेश येलेकार, विलास नागपुरे, मंगेश खोबरे, उदयराज गुप्ता, गणेश गुडेकर, विजय बोरकुटे, विलास लांबाळे, राजकुमार बोरकुटे, प्रदीप पातर, शालीक खोबरे यांनी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. परंतु मागणीच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी संतप्त होऊन इल्लूर ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.