वाघांच्या बंदाेबस्तासाठी गावकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST2021-08-27T04:40:09+5:302021-08-27T04:40:09+5:30
गडचिराेली तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमोशी, अमिर्झा, कळमटोला, धुंडेशिवणी, पिपरटोला, नवरगांव, चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गोगाव, दिभना, जेप्रा, राजगाटाचक, उसेगाव, मुरुमबोडी, ...

वाघांच्या बंदाेबस्तासाठी गावकरी आक्रमक
गडचिराेली तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमोशी, अमिर्झा, कळमटोला, धुंडेशिवणी, पिपरटोला, नवरगांव, चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गोगाव, दिभना, जेप्रा, राजगाटाचक, उसेगाव, मुरुमबोडी, बोथेडा, गिलगांव, खुर्सा, मुरमाडी या भागात नरभक्षक वाघांचा वावर आहे. नरभक्षक वाघांमुळे ११ निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. तसेच २ व्यक्ती जखमी झालेले आहेत तर ५० ते ६० पाळीव जनावरे वाघाने फस्त केले आहेत. २३ ऑगस्टला वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांना देऊन नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याकरीता निवेदन देण्यात आले होते, असे असतानासुद्धा वनविभागाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. २५ ऑगस्टला गोगाव येथील रामाजी चुधरी यांचा बळी गेला. नागरिकांचा बळी जात असताना वनविभाग काेणतीही उपाययाेजना करण्यास तयार नाहीत. त्यामुळे १ सप्टेंबरपासून ठिय्या आंदाेलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेला मनाेहर झंजाळ, याेगेश कुडवे, वामन गडपायलेे, अरूण कथलपवार, निलंकर म्हस्के, रेवनाथ मेश्राम, लताताई मडावी, रमेश गुरनुले, साेमाजी करकाडे, खुशाल मुरतेली, यादव जांभूळकर, मेघराज राऊत, रमेश चाैधरी, साईनाथ कंडीलवार, सुरेश जुमनाके, संजय शिंगाडे, संभाजी ठाकरे, ज्ञानेश्वर गुरनुले, गाेवर्धन नरुले, सुनील नक्षीणे, अतुल राऊत यांच्यासह जवळपास ५० नागरिक हजर हाेते.
बाॅक्स
माणसाची किंमत १५ लाख रुपये काय
वाघाने हल्ला केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वनविभागाकडून १५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. माणसाची किमत १५ लाख रुपयेच काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. १५ लाख रुपये वनविभाग देते म्हणून वनविभाग काेणतीही उपाययाेजना करणार नाही काय? तथाकथित वन्यजीवप्रेमी वाघांचे संरक्षण करण्याच्या केवळ गाेष्टी करतात. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्याला जर वाघाने ठार मारले तर ते चूप राहणार काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
नरभक्षक वाघामुळे आम्रपर्यंत ११ लोकांचा बळी गेलेला आहे तरी वडसा व गडचिरोली या दोन्ही उपवनरक्षकांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे व नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास वनविभागाच्या कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्यास परिसरात फिरू देणार नाही तसेच दिनांक ०१/०९/२०२१ पासून वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहोत.