तुमरकोडी गावात तीन महिन्यांपासून हातपंप बंद
By Admin | Updated: February 7, 2015 00:46 IST2015-02-07T00:46:35+5:302015-02-07T00:46:35+5:30
भामरागड तालुक्यातील कोठी गट ग्रामपंचायतमधील तुमरकोडी गावातील हातपंप मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना झऱ्याचे पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे.

तुमरकोडी गावात तीन महिन्यांपासून हातपंप बंद
रमेश मारगोनवार भामरागड
भामरागड तालुक्यातील कोठी गट ग्रामपंचायतमधील तुमरकोडी गावातील हातपंप मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना झऱ्याचे पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. झऱ्याचे पाणी मिळविण्यासाठीही नागरिकांची पायपीट होत आहे.
३५ घराची वस्ती असलेल्या तुमरकोडी गावातील हातपंप मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. बोअरवेल दुरूस्तीसाठी कोठी ग्रामपंचायतकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. कोठी येथे नागरिक ग्रामपंचायतमध्ये गेले. यावेळी ग्रामसेवक अनुपस्थित होते. भामरागडलाही जाऊन बोअरवेल बंद असल्याची तक्रार देण्यात आली. मात्र दुरूस्ती पथक अद्याप गावात दाखल झालेले नाही. ३५ लोकवस्तीच्या या गावात दोन बोअरवेल आहे. यातील एक बोअरवेल यापूर्वी दुरूस्त करण्यासाठी पथक आले होते. तेव्हा त्यांनी हँडल व इतर साहित्य काढून नेले.
दुसरी बोअरवेल तीन महिन्यांपासून बंद आहे. सभापती, उपसभापती व प.स.चे कर्मचारी कुणीही फिरकलेले नाही. कोठी ग्रामपंचायतीला सरपंच नसल्याने प्रशासकाच्या हाती सर्व कारभार आहे. ग्रामसेवक प्रशासक म्हणून काम पाहत असून त्यांचेही दुर्लक्ष आहे.