vidhan sabha 2019 - Prospective candidates run for tickets | vidhan sabha 2019 - संभावित उमेदवारांची तिकिटांसाठी धावाधाव

vidhan sabha 2019 - संभावित उमेदवारांची तिकिटांसाठी धावाधाव

ठळक मुद्देविधानसभेचा बिगुल वाजला : सर्वच पक्षांमध्ये पक्षांतराची शक्यता, पक्षनिष्ठेचा लागणार कस

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचा बहुप्रतीक्षित बिगूल अखेर शनिवारी वाजताच संभावित उमेदवारांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली आहे. सत्तारूढ भाजप-शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच इच्छुक उमेदवारांना तिकीट आपल्यालाच मिळणार की नाही अशी धाकधूक वाटत आहे. एक-दोन उमेदवार सोडल्यास कोणता मतदार संघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार आणि कोणाची तिकीट कटणार याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे संभावित उमेदवार आपापले तिकीट पक्के करण्यासाठी धावाधाव करीत आहेत.
गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी हे तीनही मतदार संघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामुळे या प्रवर्गातील अनेक उच्चशिक्षित लोक नोकरीचा त्याग करून या मतदार संघांमधून आपले राजकीय नशिब आजमावत असतात. यावेळीही ही परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.
गडचिरोलीचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनी वैद्यकीय अधिकारीपदाचा त्याग करून गेल्यावेळी भाजपच्या तिकीटवर नशिब आजमावले आणि ते यशस्वी झाले. यावेळी मधल्या काळात वातावरण चांगले नव्हते. भाजपकडून दुसऱ्या उमेदवारांची चाचपणीही झाली. त्यामुळे त्यांचे तिकीट कापले जाणार की काय, अशी चर्चा होती. मात्र अलिकडे तेसुद्धा निश्चिंत आहे.
आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे हे विशेष अशी राजकीय पार्श्वभूमी नसताना सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार यांच्या राजकीय खेळीवर विजयी झाले. यावेळीही तिकीट आणण्यापासून तर विजयी होण्यापर्यंत त्यांची मदार पोरेड्डीवार यांच्यावरच आहे. ते तिकीटच्या बाबतीत निश्चिंत असले तरी या मतदार संघात काँग्रेसच्या संभावित उमेदवारांची भाऊगर्दी आहे. पक्ष अनुभवाला प्राधान्य देते की नवीन दमाचा उमेदवार उतरवते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अहेरी मतदार संघात अजूनही वातावरण स्पष्ट झालेले नाही. भाजपच्या तिकीटासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे धोरण अजून निश्चित झालेले नाही. अम्ब्रिशराव आणि धर्मरावबाबा यांनी जनसंपर्कातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले असले तरी कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत तर्कवितर्क सुरूच आहेत. त्यामुळे पक्षांतराला ऊत येण्याची शक्यता आहे.

अहेरीत राजघराण्याची प्रतिष्ठा पणाला
अहेरी मतदार संघावर आतापर्यंत आत्राम राजघराण्याचे वर्चस्व राहिले आहे. विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम यांचे आजोबा विश्वेश्वरराव, वडील सत्यवानराव यांच्यानंतर धर्मरावबाबा यांनी तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. मात्र २००९ च्या निवडणुकीत या मतदार संघात आदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम हे राजघराण्याबाहेरील उमेदवार प्रथमच निवडून आले. तत्पूर्वी पेंटारामा तलांडी हे इतर उमेदवारांचे नामांकन रद्द झाल्यामुळे अविरोध निवडून आले होते. आता पुन्हा एकदा राजघराण्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

भाजप-काँग्रेसमध्ये गटबाजी कायम
जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. सत्ता गेल्यानंतरही गेल्या पाच वर्षातही ही गटबाजी संपलेली नाही. त्याचा काहीसा फटका लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सहनही करावा लागला. पण अजूनही संभावित उमेदवारांच्या स्वभावात फारसा फरक पडलेला नाही. दुसरीकडे भाजप सत्तेवर आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा, अनेकांचा झालेला अपेक्षाभंग, यामुळे या पक्षातही गटबाजीची लागण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाजपलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

संभावित नवीन चेहरे
वामनराव सावसाकडे (काँग्रेस)
माधुरी मडावी (काँग्रेस)
अ‍ॅड.लालसू नोगोटी (वंबआ)
डॉ.नितीन कोडवते (काँग्रेस)
संदीप कोरेत (भाजप)
अशोक धापोडकर (शिवसेना)

अम्ब्रिशराव यांची कसोटी
अहेरी मतदार संघातून पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरून जिंकून आलेले अम्ब्रिशराव आत्राम यांना भाजप सरकराने राज्यमंत्रीपदही बहाल केले. पण कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसात मंत्रीपद सोडावेही लागले. लोकसभेत या मतदार संघात घटलेले मताधिक्य पुन्हा कमावण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे.

‘पेसा’ कुणाकडे?
जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या पेसा ग्रामपंचायती आपला स्वतंत्र प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्यासाठी उत्सुक आहे. अहेरी मतदार संघात त्यांच्या वतीने कोणी लढतीत उतरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भामरागड मधून अ‍ॅड.लालसू नोगोटी हे पेसाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले. मात्र यावेळी ते वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटवर लढणार असल्याची चर्चा आहे.

शेकाप लढणारच
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा घटकपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आपले निवडणुकीतील बोधचिन्ह टिकवून ठेवण्यासाठी विशिष्ट जागांवर आपले उमेदवार उभे करणे गरजेचे आहे. आघाडीत तेवढ्या जागा शेकापला मिळणार नसल्याने काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होऊ शकते. गडचिरोलीत लढण्यासाठी शेकाप तयारीत आहे.

Web Title: vidhan sabha 2019 - Prospective candidates run for tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.