स्वतंत्र विदर्भ राज्यातूनच विदर्भाचा विकास शक्य
By Admin | Updated: September 20, 2016 00:58 IST2016-09-20T00:58:02+5:302016-09-20T00:58:02+5:30
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी धोरणामुळे विदर्भाच्या विकासात अडचणी येत आहेत.

स्वतंत्र विदर्भ राज्यातूनच विदर्भाचा विकास शक्य
निर्णय घ्या : नारायण म्हस्के यांचा विश्वास
गडचिरोली : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी धोरणामुळे विदर्भाच्या विकासात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, रखडलेले सिंचन प्रकल्प आदींसह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. परिणामी विदर्भाचा विकास रखडला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यातूनच संपूर्ण विदर्भाचा झपाट्याने विकास होऊ शकतो, असा विश्वास विदर्भवादी कार्यकर्ते नारायण हनाजी म्हस्के यांनी केला आहे.
यासंदर्भात म्हस्के यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्य नंतरच्या काळात भाषावार प्रांत रचना करण्यासाठी मराठी भाषीकांचे राज्य निर्माण करण्यासाठी विदर्भातील जनतेला विश्वासात न घेता, काही शर्ती व अटी तसेच विकासाची आश्वासने देऊन २८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर येथे करार करण्यात आला. मात्र या करारातील आश्वासनाची पूर्तता संयुक्त महाराष्ट्राने आजवर केली नाही. त्यामुळे विदर्भाच्या विकासावर परिणाम झाला. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा शासनाच्या विविध आयोगांनी तसेच नेत्यांनी कायम पुरस्कार केला आहे. बहुतांश राजकीय पक्षांनी विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी नारायण म्हस्के यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)