विदर्भाच्या मुद्यावर न.प.च्या सर्व जागा लढविणार
By Admin | Updated: July 26, 2016 01:17 IST2016-07-26T01:17:39+5:302016-07-26T01:17:39+5:30
स्वतंत्र विदर्भाची चळवळ तीव्र करण्यासाठी विदर्भ माझा पक्षाने विदर्भातील सर्वच नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

विदर्भाच्या मुद्यावर न.प.च्या सर्व जागा लढविणार
पत्रकार परिषद : राजकुमार तिरपुडे यांची माहिती
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भाची चळवळ तीव्र करण्यासाठी विदर्भ माझा पक्षाने विदर्भातील सर्वच नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गडचिरोली नगर परिषदेच्या सर्वच जागा या पक्षाच्या वतीने लढविल्या जातील, अशी माहिती पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
साधन संपत्तीने श्रीमंत असलेल्या विदर्भाची मागणी जुनी आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने व चळवळी झाल्या आहेत. मात्र राजकीय पक्षांनी स्वतंत्र विदर्भ आजपर्यंत दिलेला नाही. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करण्याबरोबरच सत्तेत सहभागी होऊन ही चळवळ आणखी तीव्र करण्यासाठी विदर्भ माझा पक्ष यावर्षी स्थापन झाला आहे.
किमान ४०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आणणाऱ्या व्यक्तीला विदर्भ माझा पक्षाची उमेदवारी दिली जाईल. उमेदवारांची चाचपणी येत्या आठ दिवसात केली जाईल. त्यामुळे उमेदवाराला पुरेसा वेळ मिळेल. विदर्भ माझा पक्षाच्या उमेदवाराने विदर्भाविषयची माहिती नागरिकांना सांगून मते मागायची आहेत. स्वतंत्र विदर्भ झाल्यास तो आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम राहिल, हे सांख्यिकीदृष्ट्या मतदारांना पटवून द्यायचे आहे. विदर्भातील ९० टक्के जनता स्वतंत्र विदर्भाच्या बाजुने आहे. त्यामुळे विदर्भ माझा पक्षाला जनता निश्चितच मतदान करेल व विदर्भ माझा पक्षाचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून येतील. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील इतर नेते विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका लढवून दाखविण्याचे आव्हान देतात. नगर परिषदांच्या निवडणुका जिंकून या नेत्यांना विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका जिंकता येतात. हे दाखवून द्यायचे आहे, अशी माहिती राजकुमार तिरपुडे यांनी दिली. यावेळी विदर्भ माझा पक्षाचे सरचिटणीस मंगेश तेलंग, नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नाना ठाकरे, प्रकाश ताकसांडे, मनोहर चलाख उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)