विदर्भ समिती पंतप्रधानांना विचारणार जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 01:17 IST2016-03-05T01:17:54+5:302016-03-05T01:17:54+5:30
लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चासह...

विदर्भ समिती पंतप्रधानांना विचारणार जाब
३१ ला दिल्लीत धरणे आंदोलन : स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय?
गडचिरोली : लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चासह ५० टक्के मुनाफा एवढा हमीभाव व शेतकऱ्यांच्या इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत येऊन बावीस ते तेवीस महिन्यांचा कालावधी उलटूनही स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. याचा जाब पंतप्रधानांना विचारण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ३१ मार्च रोजी दिल्ली येथे जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य समितीच्या वतीने देण्यात आली.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २०१३, २०१५ व आता ३१ मार्चला धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातून बहुसंख्य विदर्भवादी शेतकरी सहभागी होणार आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्यासह कर्जमुक्ती, भारनियमन बंद, वीज दर निम्मे करणे, चार लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग संपविणे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्र परिषदेला अॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अॅड. नंदा पराते, अरूण केदार, अरूण मुनघाटे, राजेंद्रसिंह ठाकूर, रमेश भुरसे, चंद्रशेखर भडांगे, प्रतिभा चौधरी, रमेश उप्पलवार, प्रा. ओमप्रकाश, समय्या पसुला, मीनाक्षी गेडाम, रमेश नायडू, रमेश बारसागडे, एजाज शेख, अमिता मडावी, रमेश मडावी व पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण
दिल्ली येथे ३१ मार्च रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करण्याकरिता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखराव यांना विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने निमंत्रण पाठविण्यात आले आहे. समितीच्या वतीने २८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत प्रमुख नेत्यांच्या भेटीही घेतल्या जाणार आहेत.