काँग्रेसच्या विजयाची मुहूर्तमेढ चामोर्शी शहरातूनच रोवा

By Admin | Updated: October 27, 2015 01:24 IST2015-10-27T01:24:12+5:302015-10-27T01:24:12+5:30

काँग्रेस सरकारने केंद्रात व राज्यात चांगले काम केले होते. परंतु भाजपने ‘अच्छे दिन’ची घोषणा देऊन मतदारांना स्वप्न

The victory of the Congress came from the city of Chamorshi | काँग्रेसच्या विजयाची मुहूर्तमेढ चामोर्शी शहरातूनच रोवा

काँग्रेसच्या विजयाची मुहूर्तमेढ चामोर्शी शहरातूनच रोवा

चामोर्शी : काँग्रेस सरकारने केंद्रात व राज्यात चांगले काम केले होते. परंतु भाजपने ‘अच्छे दिन’ची घोषणा देऊन मतदारांना स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक केली. एक ते दीड वर्षात मतदारांना बुरे दिन आणून मतदाराच्या विश्वासाला तडा गेला आहे. भाजपला त्यांची जागा दाखवून पुन्हा केंद्रात व राज्यात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी त्याची सुरूवात चामोर्शी नगर पंचायतीच्या निवडणुकीतून करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
चामोर्शी येथील वाळवंटी मैदानात सोमवारी आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मारोतराव कोवासे होते. यावेळी माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हा निरिक्षक माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार दीपक आत्राम, माजी आमदार सुभाष धोटे, रवींद्र दरेकर, प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, जि.प. सभापती अतुल गण्यारपवार, सगुना तलांडी, जिल्हा महिलाध्यक्ष भावना वानखेडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, विनोद खोबे, वैभव भिवापुरे, नितीन वायलालवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने शेतकऱ्यांचे सहा हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. धान पिकाला भाव देण्याचे काम केले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना यांचा लाभ गरीबाच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले.
गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, महसूल यंत्रणेची पुनर्रचना करून उपविभागीय कार्यालय मोठ्या गावांमध्ये निर्माण करण्याचे काम काँग्रेसने केले. जनतेच्या खिश्यातून वेगवेगळे कारणे देऊन पैसा काढला जात आहे. सरकारचा घटक पक्ष असलेली शिवसेना सरकार पॉकीटमार असल्याचे सांगत आहे. परंतु तेही सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विजयाची मूहूर्तमेढ चामोर्शीसह जिल्ह्यातील सर्व नगर पंचायत निवडणुकीतून रोवा, असे आवाहन खासदार चव्हाण यांनी केले.
या जाहीर सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. या जाहीर सभेत आमदार विजय वडेट्टीवार, जि.प.चे सभापती अतुल गण्यारपवार यांचेही जोरदार भाषण झाले. जाहीर सभेचे संचालन विनोद खोबे तर आभार राजेश ठाकूर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

कत्रोजवार यांचा १०२ कार्यकर्त्यांसह प्रवेश
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अशोक कत्रोजवार यांनी १०२ कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Web Title: The victory of the Congress came from the city of Chamorshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.