भाजपच्या विजयाचा जल्लोष
By Admin | Updated: October 19, 2014 23:37 IST2014-10-19T23:37:54+5:302014-10-19T23:37:54+5:30
गडचिरोली विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. देवराव होळी हे ७० हजार १८५ मते

भाजपच्या विजयाचा जल्लोष
गडचिरोली विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. देवराव होळी हे ७० हजार १८५ मते घेऊन विजयी झाले. अहेरी विधानसभा क्षेत्रात राजे अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम हे ५६ हजार ४१८ मते घेऊन विजयी झाले. तसेच आरमोरी क्षेत्रात क्रिष्णा गजबे हे ६० हजार ४१३ मते घेऊन विजयी झाले. गडचिरोली, देसाईगंज व अहेरी शहरात भाजपच्यावतीने भव्य मिरवणुक काढून या विजयाचा जल्लोष करण्यात आला. भाजपच्या अभूतपूर्व यशामुळे सध्या गडचिरोली जिल्हा भाजपमय झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना जिल्ह्यात माघारली असल्याचे दिसून येते. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार डॉ. देवराव होळी हे पहिल्या फेरीपासून तर अंतिम २४ व्या फेरीपर्यंत सलग आघाडीवर राहीले. त्यांची आघाडी ही मोठ्या मताची होती. त्यामुळे १५ व्या फेरीच्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात जमलेल्या भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरूवात झाली. डॉ. देवराव होळी हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर मत मोजणीच्या ठिकाणावरून मुल मार्गाने भाजपच्यावतीने विजयीरथ बनवून मिरवणुक काढण्यात आली. सदर विजयी रॅली आठवडी बाजार परिसरातून मुख्य मार्गाने भाजपाच्या प्रचार कार्यालयात पोहोचली. या रॅलीत विजयी उमेदवार डॉ. देवराव होळी यांच्या समवेत खासदार अशोक नेते, रविंद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, स्वप्नील वरगंटीवार, सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, रेखा डोळस, डेडूजी राऊत आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अहेरी शहरात राजे अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम यांच्या विजयाचा जल्लोष मुख्य मार्गाने रॅली काढून करण्यात आला. तसेच देसाईगंज शहरात क्रिष्णा गजबे यांची विजयी मिरवणूक मुख्य मार्गाने काढण्यात आली. या दोनही रॅलीत आरमोरी व अहेरी क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)