भाजीपाला पिकाला अच्छे दिन
By Admin | Updated: November 16, 2015 01:29 IST2015-11-16T01:29:47+5:302015-11-16T01:29:47+5:30
कृषी विभागाने यंदा रबीच्या हंगामात जिल्हाभरात एकूण १३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक लागवडीचे नियोजन केले आहे.

भाजीपाला पिकाला अच्छे दिन
१३ हजार ३०० हेक्टरवर नियोजन : वैरागड भागात मोठ्या प्रमाणात लागवड
वैरागड : कृषी विभागाने यंदा रबीच्या हंगामात जिल्हाभरात एकूण १३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक लागवडीचे नियोजन केले आहे. यापैकी बहुतांश भागात भाजीपाला पिकाची लागवड झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत. त्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. आरमोरी तालुक्यासह वैरागड भागातील शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांकडे कल वाढला आहे. बाजारात चांगला भाव मिळत असल्याने सध्या भाजीपाला पिकाला अच्छे दिन आल्याची भावना व्यक्त होत आहे.
आरमोरी तालुक्यासह वैरागड भागात वैनगंगा नदी, खोब्रागडी नदीसह नाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून आपल्या शेतात विहिरी बांधल्या आहेत. या पाणीस्त्रोताच्या आधारे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. अल्प पावसामुळे खरीप हंगामातील धानपीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. आता यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. आरमोरी शहरातील बाजारपेठेत आता दररोज वांगे, टमाटर, मूळा, मेथी, पालक, कोशिंबीर, फूलकोबी आदी प्रकारचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जात आहे. याशिवाय गडचिरोली बाजार पेठेतही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून भाजीपाला येत आहे. नगदी पीक असल्यामुळे भाजीपाला पिकाची शेती परवडण्यायोग्य असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)