त्रिवेणी संगमस्थळावर होणार विविध सोयी
By Admin | Updated: June 19, 2014 00:06 IST2014-06-19T00:06:38+5:302014-06-19T00:06:38+5:30
नैसर्गिक सौंदर्याने भरभरून उधळण केलेल्या भामरागड तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत भामरागडचा पर्यटनाच्या

त्रिवेणी संगमस्थळावर होणार विविध सोयी
रमेश मारगोनवार - भामरागड
नैसर्गिक सौंदर्याने भरभरून उधळण केलेल्या भामरागड तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत भामरागडचा पर्यटनाच्या दृष्टीने मोठा विकास होऊ घातला आहे. या कामांना प्रारंभ झाला असून भामरागडचे चित्र पालटेल, अशी आशा स्थानिकांना आहे.
राज्यपालांनी दत्तक घेतलेला भामरागड तालुका गडचिरोली जिल्ह्याचा दुर्गम व अतिदुर्गम तालुका आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या या तालुक्यात अनेक गावांमध्ये अजूनही मुलभूत व पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. अनेक गावात वीज, पाणी, रस्ता पोहोचलेला नाही. मात्र वनविभागाने भामरागडची नैसर्गिक साधन संपत्ती लक्षात घेऊन या भागात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विकास कामे सुरू केले आहे.
भामरागड येथे पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमस्थळाजवळ वनविभागाने नदीच्या किनाऱ्याला लागून घाट स्वरूपाच्या पायऱ्यांचे बांधकाम सुरू केले आहे. तसेच संगमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक विश्रामगृहाची इमारतही उभारलेली आहे. संगमस्थळावर आणखी विश्रामगृहाच्या स्वरूपात शेड उभे केले जाणार आहे.
संगमस्थळाजवळ आणखी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भामरागड गावातून वनविभागाच्या विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी लहान पुलही बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येथील १९६४ मध्ये निर्माण झालेल्या वनविभागाच्या विश्रामगृहाला पूर्णत: उकलण्यात आले असून त्याच स्वरूपाचे नवीन विश्रामगृह उभे केले जाणार आहे. यात जुन्यासारखेच दोन कक्ष राहणार आहे. याशिवाय सर्वसामान्य पर्यटक, नागरिक यांच्यासाठी १० ते १२ नवे सुट बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक मोठे सभागृहसुद्धा बांधले जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. याशिवाय जिल्ह्याच्या वनसंपदेची माहिती देणारे प्रदर्शनही या ठिकाणी उभारले जाणार आहे.