वारांगणा वस्ती आगीत जळून खाक
By Admin | Updated: March 26, 2016 01:19 IST2016-03-26T01:19:32+5:302016-03-26T01:19:32+5:30
गडचिरोली शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीलगतच्या वारांगणा वस्तीतील झोपड्यांना रंगपंचमीच्या दिवशी ....

वारांगणा वस्ती आगीत जळून खाक
झोपड्यांसह संपूर्ण साहित्य जळाले : वारांगणांवर पुन्हा ओढवले संकट
गडचिरोली : गडचिरोली शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीलगतच्या वारांगणा वस्तीतील झोपड्यांना रंगपंचमीच्या दिवशी गुरूवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत वारांगणा वस्तीतील धान्यासह सर्व साहित्य जळून खाक झाले. परिणामी या वस्तीतील वारांगणांवर पुन्हा संकट ओढवले आहे.
कठाणी नदी लगतच्या वारांगणा वस्तीत टीन पत्र्यांच्या एकूण १२ झोपड्या होत्या. या वस्तीत ५० वर महिला राहत होत्या. काही महिन्यांपूर्वी नगर पालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या संरक्षणात या वारांगणा वस्तीवर बुलडोजर चालवून येथील अतिक्रमण हटविले होते. मात्र काही दिवसानंतर पुन्हा या ठिकाणी झोपड्या उभारण्यात आल्या. होळी व रंगपंचमीचा सण आल्याने या वारांगणा वस्तीतील अर्ध्या महिला बाहेरगावी तर काही महिला स्वत:च्या खोलीवर राहण्यासाठी गेल्या होत्या. रंगपंचमीच्या दिवशी या वस्तीत कुणीच नव्हते. अशी माहिती तेथील एका महिलेने दिली. दरम्यान येथे कुणी नसताना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक या वस्तीला आग लागली. सदर आग कुणाकडूनही विझविण्याचा प्रयत्न न झाल्याने या आगीत झोपड्यातील जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य जळून खाक झाले. सदर वारांगणा वस्तीत विद्युत पुरवठ्याची सोय नाही. तसेच येथील महिला स्टोव्हवर स्वयंपाक करतात. या वस्तीत सिलिंडरचा वापर केला जात नाही. त्यामुळे सदर आग नेमकी कशी लागली. हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सदर घटना मोठी असूनही या घटनेबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)