वनोपज नाक्यावरील दस्तावेज जाळले
By Admin | Updated: May 12, 2015 01:12 IST2015-05-12T01:12:31+5:302015-05-12T01:12:31+5:30
आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गुड्डीगुडम येथील वनउपज तपासणी नाक्यावरील दस्तावेज मध्यरात्रीच्या

वनोपज नाक्यावरील दस्तावेज जाळले
गुड्डीगुडम येथील प्रकार : वन कर्मचाऱ्यांमध्ये दहशत; मध्यरात्री मुख्य रस्त्यावर घडली घटना
आलापल्ली : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गुड्डीगुडम येथील वनउपज तपासणी नाक्यावरील दस्तावेज मध्यरात्रीच्या सुमारास वन विभागाच्या कर्मचाऱ्याने जाळल्याची घटना घडली.
या प्रकरणी राजाराम खांदला पोलिसांनी आरोपी संतोष शेडमेके ऊर्फ पोट्टी रा. गोलाकर्जे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो वन विभागात नोकरीवर आहे. आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावर आलापल्लीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या गुड्डीगुडम येथील वन विभागाचा वनउपज तपासणी नाका आहे. संतोष शेडमेके याने आपला चेहरा कापडाने झाकलेल्या अवस्थेत येऊन मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांवर हल्ला करीत दस्तावेज आपल्या ताब्यात घेतले व ते रस्त्याच्या मध्यभागी नेऊन जाळून टाकले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या दोन-तीन ट्रक चालकांनाही त्याने मारहाण केली. एका ट्रकचालकास गंभीर दुखापत झाली असून त्या ट्रकचालकाचे नाव मात्र कळू शकलेले नाही.
यापूर्वीही सदर वन तपासणी नाक्याची नक्षलवाद्यांनी अनेकदा जाळपोळ केली होती. परंतु यावेळचा प्रकार वेगळा असून केवळ तपासणी नाक्यावरील दस्तावेज जाळण्यात आले. नाक्याचे कोणतेही नुकसान करण्यात आले नाही.
या घटनेमुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. आरोपी संतोष शेडमेके याच्याजवळ चाकू असल्याने त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना नक्षल असल्याची बतावणी केली. कर्मचाऱ्यांनी त्याला शासकीय दस्तावेज दिले.
नाक्यावर उपस्थित ट्रकचालकांनाही संतोष शेडमेके याने मारहाण केली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)
कर्मचारी निलंबित
संतोष शेडमेके याने गुड्डीगुडम वन विभागाच्या नाक्यामधील दस्तावेज जाळले. या प्रकरणी पोलिसांनी त्याचेवर गुन्हा दाखल केला आहे. वन विभागाने आरोपी संतोष शेडमेके याला निलंबित केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.