लाखोंच्या खर्चानंतरही वैरागड किल्ला ‘जैसे थे’
By Admin | Updated: November 14, 2015 01:30 IST2015-11-14T01:30:30+5:302015-11-14T01:30:30+5:30
वैरागड किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली पुरातत्व विभागाकडून लाखो रूपयांचा खर्च केला जात आहे.

लाखोंच्या खर्चानंतरही वैरागड किल्ला ‘जैसे थे’
अपुरा निधी : पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; किल्ल्याच्या बुरूजांवर आणखी उगवली झुडुपे
वैरागड : वैरागड किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली पुरातत्व विभागाकडून लाखो रूपयांचा खर्च केला जात आहे. मात्र किल्ल्याची परिस्थिती जैसे थेच असल्याने नागरिकही आश्चर्यचकीत झाले आहेत.
वैरागड येथे विराट राजाचा प्रसिद्ध किल्ला आहे. एकेकाळी विराट राजाच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला हा किल्ला काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर लागला होता. त्यामुळे या किल्ल्याचा पर्यटनस्थळामध्ये समावेश करून विकास करावा, अशी मागणी जिल्हाभरातील नागरिकांकडून होत होती. त्यानुसार पुरातत्व विभागाने २०१४-१५ या वर्षात किल्ल्याच्या सौदर्यीकरणाचे काम हाती घेतले. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची डागडुजी केली. तट, बुराजांवर वाढलेली झाडे तोडण्यात आली. यावर लाखो रूपयांचा खर्च झाला. तोडलेली झाडे पुन्हा वाढली आहेत व तिला जैसे थेच दिसत आहे. पुरातत्व विभागाने या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. किल्ल्याचे खंदक दुरूस्ती करण्यासाठी कंत्राटदाराने दगड आणून ठेवले आहेत. मात्र अजूनपर्यंत या कामाला सुरुवात झाली नाही. पुरातत्व विभाग या किल्ल्याच्या विकासाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
वैरागड किल्ल्याची डागडुजी करून आतील भागातील झुडूपे पूर्णपणे तोडल्यास चांगले पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. मात्र प्रशासन केवळ दिखावू काम करून वेळ मारून नेत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून या किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी वैरागडवासीयांकडून होत आहे. (वार्ताहर)