पारंपरिक वाद्यांचा वापर करा
By Admin | Updated: October 10, 2015 01:29 IST2015-10-10T01:29:19+5:302015-10-10T01:29:19+5:30
शारदा, दुर्गा उत्सवाला १३ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. उत्सवात मनोरंजन कार्यक्रम तसेच मूर्ती विसर्जनकाळात मोठ्या प्रमाणावर कर्कश डीजेंचा वापर केला जातो.

पारंपरिक वाद्यांचा वापर करा
गडचिरोलीत शांतता समितीची सभा : दुर्गा उत्सव मंडळांना पोलिसांचे आवाहन
गडचिरोली : शारदा, दुर्गा उत्सवाला १३ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. उत्सवात मनोरंजन कार्यक्रम तसेच मूर्ती विसर्जनकाळात मोठ्या प्रमाणावर कर्कश डीजेंचा वापर केला जातो. त्यामुळे शांतता भंग होत असते. यासाठी खबरदारी म्हणून शारदा, दुर्गा उत्सव मंडळांनी डीजेंऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यातील शांतता सभेत शुक्रवारी केले.
शांतता सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे एपीआय प्र. प्र. इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आय. नाईकवाडे, पोलीस उपनिरीक्षक अनंत कांबळे, धर्मादाय कार्यालयाचे अनिल भांडेकर उपस्थित होते.
मूर्ती विसर्जन मंडळांना योग्य प्रकारे करता यावे, याकरिता तलावाच्या स्वच्छतेबाबत तसेच रस्त्याच्या दुरूस्तीबाबत नगर परिषद प्रशासनाला सांगितले जाईल. मंडळांनी शांतता व सुव्यवस्थेत शारदा व दुर्गा उत्सव पार पाडून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले. शारदा व दुर्गा उत्सव मंडळांनी उत्सवकाळात शांततेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी केले. दरम्यान विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांचे पोलीस अधिकाऱ्यांमार्फत समाधान करण्यात आले.
यावेळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७० मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटील उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
संदेशात्मक देखावे व प्रतिकृतींना देणार बक्षीस
शारदा व दुर्गा उत्सव काळात मंडळांमार्फत विविध देखावे मंडपस्थळी साकारले जातात. मंडपस्थळी सार्वजनिक समस्यांविरोधात संदेश देणारे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर देखावे निर्माण करणाऱ्या मंडळांना पोलीस ठाण्यातर्फे बक्षीस दिले जाईल, असे शांतता सभेत पोलीस अधिकाऱ्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.