संशोधित धानाचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:28+5:30
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला तसेच कृषी महाविद्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी गडचिरोली येथे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम व शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार होते.

संशोधित धानाचा वापर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत संशोधित धान वाणाचा वापर शेतकऱ्यांनी करावा, जेणेकरून रोग व किडींना प्रतिबंध साधून उत्पादनात वाढ घडवून आणता येईल, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला तसेच कृषी महाविद्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी गडचिरोली येथे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम व शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे तर मार्गदर्शक म्हणून महाबिजचे नागपूर विभागीय व्यवस्थापक सुरेश गायकवाड, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विलास तांबे, कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाडे, महाबिजचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक एन.पी.खांडेकर, विशेषतज्ज्ञ डॉ.विक्रम कदम, पुष्पक बोथीकर, ज्ञानेश्वर ताथोड, नरेश बुद्धेवार, गणेश गणवीर आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट देऊन विविध वाणांच्या पिकांची पाहणी केली. पी.के.व्ही.तिलक, पी.के.व्ही.किसान व लाल धान यांची शिवार फेरीद्वारे पाहणी केली.
यावेळी धानोराचे प्रगतशील शेतकरी सावसागडे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.विलास तांबे यांनी शत्रू किडी व मित्र किडी तसेच धानपिकावरील रोगाचे व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. सुरेश गायकवाड यांनी महाबिजकडे असलेल्या पीक वाणाचे वैशिष्ट्य सांगून रबी हंगामात उपलब्ध असलेल्या बियाणांची माहिती शेतकऱ्यांना दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार, संदीप कऱ्हाडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहित गणवीर, जी.पी.मानकर, शशिकांत सलामे, प्रवीण नामूर्ते यांनी सहकार्य केले. एस.एस.पांडे यांनी आभार मानले.