शेती मशागतीत यंत्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 02:04 IST2016-07-31T02:04:42+5:302016-07-31T02:04:42+5:30

भामरागडसारख्या दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी आता आधुनिक शेती पध्दतीकडे वळला आहे.

Use of machinery in farm masonry | शेती मशागतीत यंत्राचा वापर

शेती मशागतीत यंत्राचा वापर

बदल : आदिवासी शेतकरी वळला आधुनिक शेतीकडे
भामरागड : भामरागडसारख्या दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी आता आधुनिक शेती पध्दतीकडे वळला आहे. या भागातील अनेक आदिवासी शेतकरी सध्या रोवणीच्या कामात चिखलणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. भामरागड तालुक्यात यांत्रिकीकरण वाढले असल्याने बैलांसह त्यांच्या गळ्यातील घुंगराचा नादमधूर आवाज आता दुर्मिळ होत चालला आहे.
७ ते १३ जुलैदरम्यान भामरागड तालुक्यात संततधार पाऊस बरसला. परिणामी पूर परिस्थितीही निर्माण झाली. आठवडाभरानंतर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी व पेरणीच्या कामात वेग घेतला. रोवणीचे काम मागे पडून आहे, या उद्देशाने भामरागड तालुक्यातील अनेक आदिवासी शेतकरी शेती मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. मागील दोन वर्षापूर्वी ग्रामीण भागात ट्रॅक्टर अत्यल्प प्रमाणात उपलब्ध होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी लाकडी नांगर दिसून यायचा. मोजके श्रीमंत शेतकरी नांगरणीच्या कामात ट्रॅक्टरचा वापर करीत होते. मात्र यंदा भामरागड तालुक्यातील मोठ्या गावातील बहुतांश शेतकरी शेतीमशागतीच्या कामात ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. त्यामुळे शेतावर बैल व लाकडी नांगर फारसे दिसत नाही. पावसाळ्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी बांबू कुंपणाचे काम केले. तसेच जळाऊ लाकडाची वाहतूकही केली. मात्र सदर जंगलातील कामेही अनेकांनी ट्रॅक्टरद्वारे केले. ट्रॅक्टरसह वाहतुकीचे अनेक साधण वाढल्याने बैलगाडीही आता काळाच्या पडद्याआड झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

शेती विकासासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज
भामरागड तालुक्यातील लाहेरी, मल्लमपोडूर, आरेवाडा, भामनपल्ली, येचली, मन्नेराजाराम, जिंजीगाव या परिसरातील शेतकरी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन वैज्ञानिक दृष्टीकोणातून यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आधुनिक शेतीकडे वळले आहेत. अनेक शेतकरी ट्रॅक्टरसह इतर यंत्राचा शेती मशागतीच्या कामात वापर करीत आहेत. आदिवासी शेतकरी सुधारित पध्दतीच्या शेतीकडे वळले असल्याने शासनानेही या भागातील शेती विकासासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. तेव्हाच भामरागड तालुक्यात कृषी क्रांती होण्यास वेळ लागणार नाही.

उन्हाळी पिकांकडेही शेतकऱ्यांची वाटचाल
भामरागड तालुक्याच्या शेती पध्दतीत पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आता बराच बदल झाला आहे. भामरागड तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतीचा विकास होत असल्याचे दिसून येत आहे. सिंचनाची सोय असलेल्या पल्ली या गावातील आदिवासी शेतकरी खरीप हंगामातील पिकांसोबतच उन्हाळी धान व इतर रबी पिके घेत आहेत. येथील शेतकरी भामरागडच्या बाजारपेठेत शेतातील कृषी उत्पादन आणून विकतात. यातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभागासह जिल्हा प्रशासनानेही प्रयत्न करावेत.

 

Web Title: Use of machinery in farm masonry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.