गोवऱ्यांसाठी बसस्थानकाचा वापर
By Admin | Updated: June 13, 2014 00:07 IST2014-06-13T00:07:06+5:302014-06-13T00:07:06+5:30
प्रवाशांचे उन्ह, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी बस थांबा तिथे बसस्थानक राज्य परिवहन महामंडळातर्फे योजना राबविली जात आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक बसथांब्यावर बसस्थानकाच्या

गोवऱ्यांसाठी बसस्थानकाचा वापर
गडचिरोली : प्रवाशांचे उन्ह, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी बस थांबा तिथे बसस्थानक राज्य परिवहन महामंडळातर्फे योजना राबविली जात आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक बसथांब्यावर बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु बसस्थानकाच्या इमारतीचा वापर प्रवाशांसाठी कमी तर खासगी व्यावसायिक व बसस्थानक गावात असल्यास त्याचा वापर गोवऱ्या, सरपण यासह घरातील अडगळीतील वस्तू ठेवण्यासाठी केला जात असल्याचे अमिर्झा येथील बसस्थानकावरून दिसून येत आहे.
तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या अमिर्झा येथील अमिर्झा-दिभणा मार्गावरील बसस्थानकावर गोवऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय बसस्थानक जागोजागी तुटलेले असल्याने फरशीवर जागोजागी खड्डे पडले आहेत. प्लॉस्टर खोदकाम केल्याप्रमाणे व्यक्तीगत नावे लिहून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेले बसस्थानक दूरवस्थेत आहे. बसस्थानकात स्वच्छता ठेवणे ही प्रवाशांची जबाबदारी तर असते शिवाय ग्रामपंचायत व गावातील नागरिकांचीही जबाबदारी असते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने बसस्थानकात होत असलेल्या खासगी वस्तू ठेवण्याच्या वापराबद्दल मौन बाळगून आहेत. एकूणच अमिर्झा येथील बसस्थानकात घाणीचे साम्राज्य असून प्रवाशी बसस्थानकासा जाण्यास धजावत नाही.
त्यामुळे अनेक प्रवासी खासगी पानटपऱ्या तसेच व्यावसायिकांच्या चबुतऱ्यावर किंवा ओट्यांवर बसतात. (शहर प्रतिनिधी)