उराडी धान खरेदी केंद्र बंद

By Admin | Updated: March 21, 2015 01:51 IST2015-03-21T01:51:50+5:302015-03-21T01:51:50+5:30

तालुक्यातील उराडी येथील सरकारी धान खरेदी केंद्रात बारदाणा नसल्याने हे केंद्र महिनाभरापासून बंद आहे.

Uradhi rice shopping center is closed | उराडी धान खरेदी केंद्र बंद

उराडी धान खरेदी केंद्र बंद

कुरखेडा : तालुक्यातील उराडी येथील सरकारी धान खरेदी केंद्रात बारदाणा नसल्याने हे केंद्र महिनाभरापासून बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना पडेल भावाने खासगी केंद्रांवर धान विकावा लागत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
उराडी येथे आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र आहे. परंतु या केंद्रावर बारदाणाच उपलब्ध नसल्याने हे केंद्र महिनाभरापासून बंद आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेले सुमारे ५०० क्विंटल धान पडून आहे. आठवडाभरापूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने बऱ्याच धानाची नासाडीही झाली. शेतकरी धानाचे वजन करण्याची विनंती करतात. मात्र संबंधित कर्मचारी बारदाणा नसल्याचे कारण पुढे करुन वजन करण्यास नकार देतात. याबाबत आरमोरी येथील संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास तेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उराडी येथील केंद्र बंद असल्याने गरजू शेतकऱ्यांना देसाईगंज येथे धान न्यावे लागत आहेत. परंतु तेथे उच्च प्रतीच्या धानाला केवळ १७५० रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे. सरकारी धान खरेदी केंद्रापेक्षा हा भाव १०० रुपयांनी कमी आहे. शिवाय वाहतुकीसाठी येणारा खर्च वेगळाच. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी सहकारी संस्था व बँकेकडून कर्ज घेतले होते. शून्य टक्के व्याजदराने कर्जाची परतफेड करावयाची झाल्यास ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. परंतु आता मार्च महिना संपण्यास अवघे १० दिवस शिल्लक असताना खरेदी केंद्र सुरु न झाल्याने कर्ज फेडावे कसे, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Uradhi rice shopping center is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.