वऱ्हांड्यात रूग्ण अन् वार्डात बॅटऱ्या
By Admin | Updated: September 11, 2014 23:31 IST2014-09-11T23:31:51+5:302014-09-11T23:31:51+5:30
रूग्णांना दाखल करून उपचार करावयाच्या वार्डात रूग्णालयाच्या प्रशासनाने बॅटऱ्या ठेवल्या आहेत. तर जागेअभावी येथील रूग्णांना वऱ्हांड्यात दाखल राहून उपचार घ्यावा लागत आहे.

वऱ्हांड्यात रूग्ण अन् वार्डात बॅटऱ्या
बॅटऱ्या झाल्या निकामी : कोरची ग्रामीण रूग्णालयाचा अजब खाक्या
कोरची : रूग्णांना दाखल करून उपचार करावयाच्या वार्डात रूग्णालयाच्या प्रशासनाने बॅटऱ्या ठेवल्या आहेत. तर जागेअभावी येथील रूग्णांना वऱ्हांड्यात दाखल राहून उपचार घ्यावा लागत आहे. असा अजब खाक्या कोरची ग्रामीण रूग्णालयात पहावयास मिळत आहे. यामुळे रूग्णालयातील रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात रूग्णांची संख्या वाढत असते. सध्या कोरची ग्रामीण रूग्णालयात जवळपास १५० रूग्ण दाखल आहेत. ५० हजार लोकसंख्या असलेल्या कोरची तालुक्याची आरोग्य व्यवस्था एकाच रूग्णालयावर अवलंबून आहे. मे २०१४ ला पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते येथील ग्रामीण रूग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. सुसज्ज इमारत असून या रूग्णालयात अनेक आरोग्य सुविधा पुरविण्याचे आश्वासन त्यांनी उद्घाटनाप्रसंगी दिले होते. कोरची ग्रामीण रूग्णालयात ३० खाटांची व्यवस्था असून ३ वार्ड आहेत. यात पुरूष वार्ड, महिला वार्ड व गर्भवती महिला तसेच लहान मुलांचा एक वार्ड आहे. क्रमांक १ च्या पुरूष वार्डामध्ये रूग्णालयाच्या प्रशासनाने बॅटऱ्या ठेवल्या आहेत. त्यामुळे महिलांच्याच वार्डात महिला व पुरूष रूग्णांना दाखल केले जात आहे. मात्र या वार्डातील खाटांची तसेच जागेची कमतरता भासत असल्याने या रूग्णालयातील अनेक रूग्णांना वऱ्हाड्यांत खाटा लावून उपचार केल्या जात आहे. महिन्यातून एकवेळा वार्डाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. अशावेळी एक वार्ड रिकामे ठेवणे गरजेचे असते. मात्र दोन्ही वार्डात मोठ्या प्रमाणात रूग्ण दाखल असल्याने या वार्डाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले नाही. विद्युत पुरवठ्याच्या लपंडावावर मात करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून या बॅटऱ्या जोडण्यात आल्या. मात्र ही जोडणी खराब झाली आहे.
(तालुका प्रतिनिधी)