जिल्ह्यात अभूतपूर्व ‘कोरोना’बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST2020-03-23T05:00:00+5:302020-03-23T05:00:30+5:30
गडचिरोली शहरातील रस्ते सकाळपासूनच निर्मनुष्य झाले होते. बसस्थानकात एकही प्रवाशी नसल्याने संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. काही महत्त्वाच्या गावांमध्ये शनिवारी रात्री बस मुक्कामी होत्या. त्या बस रिकाम्या आल्या. आकस्मिक स्थितीत काही चालक व वाहकांची ड्युटी रविवारी लावण्यात आली होती. मात्र एकही प्रवाशी बसस्थानकावर न आल्याने सर्वांच्या नेमणुका रद्द करून त्यांना सुटी देण्यात आली.

जिल्ह्यात अभूतपूर्व ‘कोरोना’बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू पाळण्याबाबत पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवत रविवारी सकाळपासून रात्री ९ वाजेपर्यंत घराबाहेर पाऊल ठेवले नाही. त्यामुळे जिल्हाभरात खरोखरच कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.
गर्दी टाळणे हा कोरोनापासून बचावाचा सर्वात चांगला प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गर्दी टाळण्याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. प्रशासनामार्फत या कर्फ्यूबाबत जनजागृती केल्याने शहरांसोबतच ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला. गडचिरोली शहरातील रस्ते सकाळपासूनच निर्मनुष्य झाले होते. बसस्थानकात एकही प्रवाशी नसल्याने संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. काही महत्त्वाच्या गावांमध्ये शनिवारी रात्री बस मुक्कामी होत्या. त्या बस रिकाम्या आल्या. आकस्मिक स्थितीत काही चालक व वाहकांची ड्युटी रविवारी लावण्यात आली होती. मात्र एकही प्रवाशी बसस्थानकावर न आल्याने सर्वांच्या नेमणुका रद्द करून त्यांना सुटी देण्यात आली. बसस्थानकावर दोन-चार कर्मचारी दिसून येत होते.
गडचिरोली शहरातील पानठेले, चहाटपऱ्यां, औषधीची दुकाने व इतर सर्वच दुकाने बंद होती. नियमित भरणारी गुजरी व दर रविवारी भरणारा आठवडी बाजार सुध्दा भरला नाही. तेलंगणा ते छत्तीसगडमार्गे चालणारे ट्रक फक्त अधूनमधून येत होते. वाहने व प्रवाशी नसल्याने एका टोकावरून नजर टाकल्यास दुसऱ्या टोकापर्यंतचे रस्ते दिसून येत होते.
कोरोनाना नियंत्रणासाठी जी यंत्रणा काम करीत आहे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सायंकाळी अनेकांनी घराच्या पोर्चमध्ये येऊन टाळ्या आणि ताटे वाजविली. मुलांनी याचा विशेष आनंद घेतला.
नागरिकांचे आभार
दिवसभर घरात थांबून आपण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आपणाला मध्यरात्रीपासून अजून एक जबाबदारी पार पाडायची आहे. ती म्हणजे राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. यासाठीही आपल्या सर्वांकडून सहकार्य अपेक्षित आहे. या सहकार्यासाठी आपले आभार.
- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी
असेच सहकार्य करा
गडचिरोली जिल्ह्यातील शहरीच नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांनीही कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील नागरिक जागरूक असल्याचे यावरून लक्षात येते. यापुढेही प्रशासनाला असेच सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे.
- डॉ.विजय राठोड, सीईओ, जि.प.