अनावश्यक फलकाने साैंदर्यीकरणावर बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:47+5:302021-02-05T08:51:47+5:30
ट्रॅक्टर चालकांचे वाहतूक परवान्यावर प्रश्नचिन्ह एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान ...

अनावश्यक फलकाने साैंदर्यीकरणावर बाधा
ट्रॅक्टर चालकांचे वाहतूक परवान्यावर प्रश्नचिन्ह
एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण मद्य प्राशन करून ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात पाच ते दहा नागरिकांचा मागील पाच वर्षांत मृत्यू झाला आहे.
घोट-रेखेगाव मार्ग उखडला
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. सदर मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
भेंडाळा बस स्थानकावर गतिरोधकाचा अभाव
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बस स्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. बस स्थानकावर प्रवाशी व विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी राहते. गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग कमी केला जात नाही.
जि.प. कॉलनीतील घरांची दुरुस्ती करा
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था आहे.
कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजना महिला आघाडीवर आहेत.
कनेरी, नागेपल्ली दूध शीतकरण केंद्र बंदच
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शितकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात अपुरी अग्निशमन व्यवस्था
अहेरी : १० लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये १,६४८ गावे आहेत. घटनांच्या वेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहन जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
भंगार वाहनांवर बंदी घालण्याची मागणी
गडचिरोली : अनेक टॅक्सीचे मागील दार भंगार झालेले आहे. प्रवासादरम्यान अनेक टॅक्सींच्या छतांचा मोठ्याने आवाज होतो. अनेक जुन्या टॅक्सींमध्ये सीट फाटली असल्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी त्रास होतो.
पोर्ला बस स्थानकावर अपघाताची शक्यता
गडचिरोली : तालुक्यातील, तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोटगूल येथे व्यावसायिक शिक्षणाचा अभाव
कोरची : कोटगूल येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोटगूल परिसरात चार माध्यमिक व दोन उच्च माध्यमिक विद्यालये आहेत.
झाडीपट्टीच्या नाट्य कलावंतांची उपेक्षा
देसाईगंज : ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. कित्येक कलावंतापुढे वृद्धापकाळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. शासनाचे मात्र या झाडीपट्टीतील कलावंतांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
अतिक्रमणाने अहेरीत वाहतुकीची कोंडी
आरमाेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा होत आहे.
राजपूर व बोरीतील डुकरांचा बंदोबस्त नाही
अहेरी : राजपूर पॅच व बोरी परिसरात मोकाट डुकरांचा प्रकोप वाढला आहे. या भागातील नागरिक डुकरांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले असल्याने त्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. डुकरांच्या हैदोसामुळे लहान मुलेही भयभीत झाले आहेत.
मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून, अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.
पशुपालनाच्या योजनांबाबत जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
आरोग्य केंद्रात राहणे सक्तीचे करा
सिरोंचा : प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात निवासस्थाने बांधून देण्यात आली आहेत. मात्र, बहुतांश डॉक्टर व परिचारिका निवासस्थानांमध्ये राहत नाही.
चामोर्शी मार्गावर शेड उभारा
गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराचा चामोर्शी मार्गावर थांबा देण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी शेड नसल्याने प्रवासी भर उन्हात बसची प्रतीक्षा करीत असतात. सदर बसथांब्यावरून अनेक प्रवाशी चामोर्शी, अहेरीकडे ये-जा करतात. त्यामुळे गडचिरोली आगाराने चामोर्शी मार्गावर प्रवाशांसाठी शेड उभारावा, अशी मागणी होत आहे. शेडअभावी येथे उभे राहणे कठीण झाले आहे.