अज्ञात रोगाने एकाच गावात १२ शेळ्या दगावल्या
By Admin | Updated: November 16, 2015 01:17 IST2015-11-16T01:17:58+5:302015-11-16T01:17:58+5:30
चामोर्शी तालुक्यातील विसापूर रै. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या निमडर टोला या एकाच गावात अज्ञात रोगाची लागण झाल्यामुळे शुक्रवारी १२ शेळ्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे.

अज्ञात रोगाने एकाच गावात १२ शेळ्या दगावल्या
निमडर टोला येथील घटना : पशुसंवर्धन विभाग प्रचंड सुस्त; विशेष शिबिर सुरू करण्याची मागणी
आमगाव (म.) : चामोर्शी तालुक्यातील विसापूर रै. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या निमडर टोला या एकाच गावात अज्ञात रोगाची लागण झाल्यामुळे शुक्रवारी १२ शेळ्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यास पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
निमडर टोला येथे गेल्या आठवडाभरापासून शेळ्यांना अज्ञात रोगाची लागण झाली. मात्र वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने बाराही शेळ्यांचा मृत्यू झाला. हरिचंद्र सातार यांच्या मालकीच्या चार, दादाजी सातार यांच्या तीन, गोविंदा सातार यांच्या दोन, गणू सातार यांच्या तीन अशा एकूण १२ शेळ्या दगावल्या. त्यामुळे चार पशुपालकांचे जवळपास ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चारही पशुपालकांनी केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रा.पं. सदस्य गिरीश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गावातील पाळीव प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तत्काळ गावात विशेष पशुवैद्यकीय शिबिर सुरू करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
अल्प पावसामुळे यंदा खरीप हंगामातील धान पीक शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट कोसळले. आता या शेतकऱ्यांची रबी पिकांवर मद्दार आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अनेकांनी पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र अज्ञात रोगाने १२ शेळ्यांचा मृत्यू झाल्याने निमडर टोला येथील शेतकरी पशुपालकांवर संकट कोसळले आहे. (वार्ताहर)