विद्यापीठाची साडेसाती संपेचना!

By Admin | Updated: March 29, 2015 01:23 IST2015-03-29T01:23:17+5:302015-03-29T01:23:17+5:30

२०११ मध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

University closure | विद्यापीठाची साडेसाती संपेचना!

विद्यापीठाची साडेसाती संपेचना!

गडचिरोली : २०११ मध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. परंतु या गोंडवाना विद्यापीठांतर्गत विदवत्त व व्यवस्थापन समित्यांचे गठण मागील चार वर्षांपासून रखडलेले आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे धूळखात पडून आहे. आघाडी सरकारच्या काळात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा प्रस्ताव बासनात बांधून ठेवला होता. नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदारूढ होऊन सहा महिने लोटले, मात्र गोंडवाना विद्यापीठाची साडेसाती अजुनही समाप्त झालेली नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सरकारप्रती अतिशय नाराज आहेत.
२ आॅक्टोबर २०११ ला गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यात व्यवस्थापन परिषद, विदवत्त परिषद, विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, विविध अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या नियुक्त्या व स्थापना होणे आवश्यक होते. या परिषदा व मंडळ यांच्या माध्यमातूनच विद्यापीठाच्या प्रत्येक निर्णयाला विधिवत मान्यता देण्याचे काम केले जाते. व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेशिवाय विद्यापीठाचे आर्थिक व प्रशासकीय निर्णय विधिवत होत नाही. तसेच विदवत्त परिषदेच्या मान्यतेशिवाय अभ्यासक्रमही विधीवत होत नाही. नव्याने निर्माण झालेल्या गोंडवाना विद्यापीठात यापैकी कशाचीही स्थापन करण्यात आलेली नाही.
विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूंनी आपल्या मर्जीनुसार विद्या शाखांचे अधिष्ठाता निवडलेले आहेत. मात्र त्यांच्या निवडीला शासनाने अजुनही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा कारभार आतापर्यंत प्रथम कुलगुरू आपल्या मर्जीनुसारच रेटून नेत असल्याचे दिसून येत होते. मात्र मार्च २०१४ मध्ये गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार हे ही सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या जागी हंगामी कुलगुरू म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार व त्यानंतर शासनाने नियुक्त केलेले कुलगुरू म्हणून डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी धूरा हाती घेतली. त्यानंतर तरी राज्य शासनाकडून या समित्या गठीत होतील, अशी आशा होती.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज तसेच दोन आमदारांनी नागपूर येथे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थित विद्यापीठाच्या प्रश्नाबाबत बैठक घेतली. त्यानंतरही विद्यापीठाच्या विदवत्त व व्यवस्थापन समितीसह अन्य समित्यांच्या स्थापनेबाबत काहीही हालचाल शासनस्तरावरून झालेली नाही. ही फाईल अद्यापही नव्या सरकारकडेही धूळखातच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

राज्यपालांनी प्राधिकरणाच्या निवडणुका घेण्याचे दिले आदेश
महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नामेनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये असलेल्या प्राधिकरणाच्या निवडणुका आॅगस्ट २०१५ पूर्वी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्राधिकरणाच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्या आहे. १५ एप्रिलला या संदर्भात सूचनाही जारी होण्याची शक्यता आहे. मात्र गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात राज्य सरकारकडून अजुनही प्राधिकरणाच्या समित्याच गठण झालेल्या नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात या निवडणुका कशा होतील, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

Web Title: University closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.