पुढाऱ्यांमुळे नव्हे तर संविधानामुळेच अखंड भारत
By Admin | Updated: February 7, 2017 00:47 IST2017-02-07T00:47:34+5:302017-02-07T00:47:34+5:30
देशात विविधतेत एकता असतानाही देश एकात्म आणि अखंड आहे; तो राजकीय पुढाऱ्यांमुळे नव्हे तर केवळ भारतीय संविधानामुळेच होय, ..

पुढाऱ्यांमुळे नव्हे तर संविधानामुळेच अखंड भारत
देविदास घोडेस्वार यांचे प्रतिपादन : सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान जनजागृती कार्यक्रम
गडचिरोली : देशात विविधतेत एकता असतानाही देश एकात्म आणि अखंड आहे; तो राजकीय पुढाऱ्यांमुळे नव्हे तर केवळ भारतीय संविधानामुळेच होय, असे परखड मत भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांनी रविवारी व्यक्त केले.
स्थानिक बळीराजा पॅलेसमध्ये सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, कुणबी समाज संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात प्रा. घोडेस्वार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून नागपूरचे ओबीसी समाज प्रवक्ता कृष्णाजी टिकले उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मजबूत केंद्र शासनाची केलेली तरतूद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. सध्या अमेरिका, युरोपसारखे राष्ट्र बहुधर्मिय होऊ पाहत असताना भारतात विशिष्ट धर्माबाबत होणारे वक्तव्य क्लेषदायक असून देशाला विनाशाकडे घेऊन जाणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध देशातील संविधानाचा केलेला अभ्यास आणि त्यांची विद्वत्ता याची राष्ट्राला गरज लक्षात घेऊन त्यांना संविधान सभेत येण्यासाठी शिफारस करण्यात होती, असे प्रतिपादनही प्रा. घोडेस्वार यांनी केले. यावेळी कृष्णा टिकले म्हणाले, बाबासाहेबांना शिक्षणासाठी व चळवळीसाठी मराठा व कुणबी राजांनी सहकार्य केले. बाबासाहेबांचे कार्य संपूर्ण राष्ट्रासाठी असतानाही त्यांना केवळ एका विशिष्ट घटकापुरते मर्यादित ठेवले जात आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी दादाजी चापले म्हणाले, सत्य, असत्याची शहानिशा करण्यासाठी तर्कनिष्ठेचा आधार घेऊन समाजात वैैज्ञानिक दृष्टिकोन रूजविणे गरजेचे आहे. यावेळी चापले यांनी उदाहरणेही सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे जिल्हा संयोजक श्याम रामटेके, संचालन अशोक मांदाडे तर आभार सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे जिल्हा सहसंयोजक धर्मानंद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारोती दुधबावरे, गोकुल झाडे, रूचित वांढरे, नम्रता मेश्राम, नूतन मेश्राम, अपेक्षा रामटेके व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, माळी संघ, ओबीसी संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)