दिवाळीची अनोखी परंपरा; गडचिरोलीत जुंपते जावयांची कुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 14:50 IST2018-11-08T14:49:22+5:302018-11-08T14:50:00+5:30
गडचिरोली जिल्ह्यातल्या अडपल्ली या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो. ही अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून अडपल्ली या गावात सुरू आहे.

दिवाळीची अनोखी परंपरा; गडचिरोलीत जुंपते जावयांची कुस्ती
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला सासरी जाणाऱ्या जावयाचा ना-ना प्रकारे मानसन्मान आणि पाहुणचार केला जातो. पण गडचिरोली जिल्ह्यातल्या अडपल्ली या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो. ही अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून अडपल्ली या गावात सुरू आहे.
गडचिरोलीपासून जवळच असलेल्या अडपल्लीत दिवाळीच्या पाडव्याला, अर्थात बलिप्रतिपदेला पाळली जाणारी ही परंपरा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही जावयांची कुस्ती पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमतात. वर्षभरात गावातील ज्या मुलीचे लग्न झाले तिच्या पतीला, अर्थात गावच्या जावयाला या पहिल्या दिवाळीचे रितसर निमंत्रण पाठविले जाते. त्यानंतर जावई व मुलीला घेण्यासाठी जाऊन लक्ष्मीपूजनच्या दिवशीच गावात आणले जाते. त्यांना नवीन कपडे घेतले जातात. बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गायींची पुजा केली जाते. गायींचा कळप गावाबाहेर ज्या ठिकाणी जमतो त्या आखरावरच मग नवीन जावयांमध्ये कुस्ती लावली जाते.
या कुस्तीत हार-जीत कोणतेही बक्षीस मिळवण्यासाठी नसली तरी गावात मिळणारा मान मोठा असतो. या खेळात गावकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होते. त्यानंतर मिरवणुकीने वाजत-गाजत जावईलोकांना त्यांच्या सासऱ्याच्या घरी पोहोचविले जाते. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत कधी जावई उपलब्ध झाले नाही तर गावातील युवकांमध्येही कुस्ती रंगते. गावातच राहणाऱ्या भोयर कुटुंबातील व्यक्ती या कुस्तीसाठी पंचाची जबाबदारी सांभाळतात.