अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केंद्र शासनाचा निषेध
By Admin | Updated: March 2, 2016 01:48 IST2016-03-02T01:48:25+5:302016-03-02T01:48:25+5:30
केंद्र शासनाने २९ फेब्रुवारी रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात बालकल्याण विभागासाठी मागील वर्षी एवढीच १५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केंद्र शासनाचा निषेध
अर्थसंकल्पात तरतूद केली नाही : केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
गडचिरोली : केंद्र शासनाने २९ फेब्रुवारी रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात बालकल्याण विभागासाठी मागील वर्षी एवढीच १५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात मंगळवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली.
या मोर्चाला मार्गदर्शन करताना प्रा. दहिवडे म्हणाले की, महिला व बालकल्याण हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. २०१३-१४ मध्ये या विभागासाठी २७ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर या विभागासाठी असलेल्या निधीमध्ये केंद्र शासन दरवर्षी कपात करीत आहे. २०१४-१५ मध्ये १८ हजार कोटी, २०१५-१६ मध्ये १५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली होती. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पातही १५ हजार कोटींचीच तरतूद केली आहे.
मागील दोन वर्षांपासून केंद्र शासन मानधन वाढीचे आश्वासन देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतची तरतूद अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निराशा झाली. परिणामी केंद्र शासनाच्या विरोधात देशभरात निषेध मोर्चा काढण्यात येत असल्याचे प्रतिपादन केले.
गडचिरोली येथे प्रेस क्लबचे ते इंदिरा गांधी चौकदरम्यान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. निषेध मोर्चादरम्यान शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. (नगर प्रतिनिधी)