विषय समिती सभापतींची अविरोध निवड
By Admin | Updated: January 25, 2017 02:03 IST2017-01-25T02:03:31+5:302017-01-25T02:03:31+5:30
गडचिरोली नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली.

विषय समिती सभापतींची अविरोध निवड
गडचिरोली पालिका : स्थायी समितीत भूपेश कुळमेथे, मुक्तेश्वर काटवे व माधुरी खोब्रागडे यांची वर्णी
गडचिरोली/देसाईगंज : गडचिरोली नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. त्यानुसार भाजपचे आनंद शृंगारपवार, अॅड. नितीन उंदिरवाडे, केशव निंबोड, अल्का पोहणकर व गुलाब मडावी यांची विषय समित्यांच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तर दहा सदस्यीय स्थायी समितीत उपरोक्त विषय समितीच्या सभापतींसह भाजपचे भूपेश कुळमेथे, मुक्तेश्वर काटवे व माधुरी खोब्रागडे यांची निवड करण्यात आली.
देसाईगंज नगर पालिकेतही पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक घेण्यात आली. यावेळी देसाईगंजचे नगराध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली नगरपालिकेच्या विषय व स्थायी समितीच्या निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी १९ जानेवारीला सभेची नोटीस काढली होती. त्यानुसार मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर हे पिठासीन अधिकारी म्हणून सभेला उपस्थित होते. तर सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी कृष्णा निपाने उपस्थित होते.
सुरवातीला सकाळी १० ते १२ या कालावधीत स्थायी व विषय समित्यांची सदस्यसंख्या ठरविण्यात आली. तसेच नगरपालिकेचे उपाध्यक्ष हे कोणत्या विषय समितीचे पदसिध्द सभापती असतील, हे निश्चित करण्यात आले. त्यानुसार स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य या समितीचे सभापतीपद उपाध्यक्षाकरीता निश्चित करण्यात आले. तसेच स्थायी समितीची सदस्यसंख्या दहा निश्चित करण्यात आली.
दुपारी १२ ते २ या कालावधीत विषय समित्यांच्या सभापती पदासाठी नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले. पाच विषय समित्यांसाठी पाचच नामांकन दाखल झाले. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक अविरोध पार पडली. त्यानंतर खासदार अशोक नेते, ज्येष्ठ पदाधिकारी बाबुराव कोहळे यांनी सर्व नवनिर्वाचित सभापतींचे व समितीच्या सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनात गडचिरोली शहर विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)