मुलचेरातील अनेक ग्रा.पं.मध्ये अविरोध निवड

By Admin | Updated: May 13, 2015 01:20 IST2015-05-13T01:20:05+5:302015-05-13T01:20:05+5:30

तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका रविवार व सोमवारी स्थानिक पातळीवरील ग्राम पंचायतींच्या सभागृहात पार पडल्या.

Uncontrolled selection in many GP water pumps | मुलचेरातील अनेक ग्रा.पं.मध्ये अविरोध निवड

मुलचेरातील अनेक ग्रा.पं.मध्ये अविरोध निवड

मुलचेरा : तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका रविवार व सोमवारी स्थानिक पातळीवरील ग्राम पंचायतींच्या सभागृहात पार पडल्या. सुंदरनगर, चुटूगुंटा, गोमणी ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा रोवला. तर लगाम ग्राम पंचायतीवर माजी आ. दीपक आत्राम समर्थित मारटकर यांच्या पॅनलने वर्चस्व प्राप्त केले. गोमणी, सुंदरनगर येथे सरपंच व उपसरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली होती. दरम्यान अनेक ठिकाणी सरपंच व उपसरपंच पद निवड प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडली.
चुटूगुंटा ग्रा. पं. वर सरपंच, उपसरपंच अविरोध
तालुक्यातील चुटूगुंटा ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक सोमवारी अविरोध पार पडली. सरपंचपदी सुधाकर गंगाराम नैताम तर उपसरपंचपदी दुशांत जनार्धन मडावी यांची निवड करण्यात आली. सुधाकर नैताम व दुशांत मडावी यांच्या विरोधात नामांकन अर्ज दाखल न झाल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली. सभेला नवनिर्वाचित सदस्य नानाजी बुरमवार, मनोज पेंदाम, उषा सडमेक, वनिता आत्राम, सुनीता मडावी, उषा कुसनाके, शारदा ढोके, सिडाम उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. भडके यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांनी पदभार स्वीकारल्याने चुटूगुंटा व टिकेपल्ली येथे विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला.
सुंदरनगर ग्रा. पं. वर राकॉचा झेंडा
सुंदरनगर ग्राम पंचायतीची सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक रविवारी पार पडली. निवडणुकीत सरपंचपदी चंपा सुनील स्वर्णकार यांनी तर उपसरपंचपदी निखील अनिल इज्जतदार यांनी बाजी मारली. प्रतिस्पर्धी गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार अंजू शिशिर गाईन व उपसरपंच पदाचे उमेदवार सुभाषचंद्र नेपाल दास यांना प्रत्येकी चार मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पेंदाम यांनी काम पाहिले, तर ग्रामसेवक तोकलवार यांनी सहकार्य केले.
गोेमणी ग्राम पंचायत राकॉच्या ताब्यात
गोमणी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत दिनेश विठ्ठल उरेते यांची अविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शकुंतला बाबुराव मरापे यांनी चार मते पटकावित बाजी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार साईनाथ चौधरी यांना एक मतसुद्धा मिळविता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हेमके, ग्रामसेवक कुमरे यांनी काम पाहिले.
तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सरपंच व उपसरपंच पदासाठी विविध गटांमध्ये चुरस निर्माण झाली होती.
याकरिता गट व पॅनलच्या माध्यमातून विशिष्ट उमेदवारासाठी मोर्चेबांधणीही जोरदार सुरू होती. मात्र काही ठिकाणी निवड अविरोध झाली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Uncontrolled selection in many GP water pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.