विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाजनिर्मिती अशक्य
By Admin | Updated: April 9, 2015 01:33 IST2015-04-09T01:32:42+5:302015-04-09T01:33:28+5:30
सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाजनिर्मिती अशक्य
गडचिरोली : सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तळागाळातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचणार नाही, तोपर्यंत सामाजिक समता निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर बुधवारपासून सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवनात त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सहाय्यक समाजकल्याण आयुक्त विनोद मोहतुरे, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, उपपोलीस अधीक्षक (गृह) बी. डी. इलमकर, प्राचार्य अल्लमवार, कृषी अधिकारी कापसे आदी उपस्थित होते.
समता सप्ताहाचे आयोजन तळागाळातील लाभार्थ्यांना योजना पोहोचविण्याचा उपक्रम असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, विशेष करून युवकांना ग्रंथालयाशी जोडून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी योजना तयार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. यावेळी समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, कृषी अधिकारी कापसे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजकल्याण निरीक्षक संदीप खोबरखेडे, सहाय्यक लेखाधिकारी समीर देशमुख, सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध महामंडळाचे व्यवस्थापक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे तर आभार सारंग गावंडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)