अनधिकृत स्मारक हटविले
By Admin | Updated: November 27, 2015 01:46 IST2015-11-27T01:46:39+5:302015-11-27T01:46:39+5:30
येथील श्रीराम चौकातील पडक्या क्वॉर्टर शेजारी एका समाजाने अतिक्रमण करून स्मारक उभारले होते.

अनधिकृत स्मारक हटविले
वन विभागाची आलापल्लीत कारवाई : विरोधकांना पोलिसांच्या दिले ताब्यात
आलापल्ली : येथील श्रीराम चौकातील पडक्या क्वॉर्टर शेजारी एका समाजाने अतिक्रमण करून स्मारक उभारले होते. सदर जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने बुधवारी वन विभागाने अनधिकृत स्मारकावर कारवाई करीत ते हटविले. यावेळी वन विभागाच्या कारवाईला विरोध करणाऱ्या काही लोकांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
आलापल्ली येथील श्रीराम चौकात वन विभागाची वसाहत आहे. वसाहतीमधील जमिनीवर एका समाजाच्या लोकांनी त्यांच्या समाजातील थोर महापुरूषांच्या प्रतिमा लावून स्मारक उभारले होते. सदर माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस व तहसीलदारांना दिली. त्यानंतर पोलीस पथक व तहसीलदारांना अतिक्रमण स्थळावर बोलावून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. वन विभागाच्या या कार्यवाहीला उपस्थित काही समाज बांधवांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी विरोध करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले व अतिक्रमण हटविले. अतिक्रमण केलेली जागा वन विभागाची असल्याने येथे वन वसाहत आहे. येथील क्वॉर्टर पडक्या अवस्थेत असल्याने येथे अवैधरित्या स्मारकाची उभारणी काही लोकांकडून करण्यात आली होती. वन विभागाच्या अखत्यारित सदर जागा येत असल्याने वरिष्ठ अधिकारी व पोलीस विभागाच्या समक्ष अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक अग्रवाल, नायब तहसीलदार जिमलवार, पोलीस उपनिरीक्षक रतूभाई मुलानी व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)