विजेसाठी २०१८ पर्यंतचा अल्टिमेटम
By Admin | Updated: May 13, 2017 02:02 IST2017-05-13T02:02:00+5:302017-05-13T02:02:00+5:30
जिल्ह्यातील एकूण १६०० गावांपैकी १९४ गावांपर्यंत अजूनही वीज पुरवठा झाला नाही.

विजेसाठी २०१८ पर्यंतचा अल्टिमेटम
मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : आलापल्ली येथील वनसंपदा कार्यालयात घेतला विकास कामांचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/ अहेरी : जिल्ह्यातील एकूण १६०० गावांपैकी १९४ गावांपर्यंत अजूनही वीज पुरवठा झाला नाही. विजेशिवाय या गावांचा विकास होणे अशक्य होणार असल्याने प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत जून २०१८ पर्यंत गावांना वीज जोडणी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आलापल्ली उपविभागीय वनसंरक्षक कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाभरातील विकास कामांचा आढावा शुक्रवारी घेण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आढावा बैठकीला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खा. अशोक नेते, आ. मितेश भांगडिया, आ. डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पालक सचिव विकास खारगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.
आढावा बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, विकास घडविण्याचा संकल्प मनात ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावे, या भूमिकेतून तालुकास्तरापर्यंतच्या कामांचा आढावा घेणे सुरू आहे. शासनाने संपूर्ण लक्ष गडचिरोलीच्या विकासावर केंद्रीत केले आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, सामान्य आणि शेवटच्या नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे हाच खरा विकास आहे, असे प्रतिपादन केले.
डिसेंबर ते मे या कालावधीत ४२ गावांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जून २०१७ पर्यंत ८९ गावे विजेने जोडली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी आढावा बैठकीदरम्यान सादर केली असता, जून २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्वच गावांना वीज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात एकूण एक लाखाहून अधिक शेतकरी आहेत. मात्र जवळपास १९ हजारच शेतकऱ्यांना वीज जोडणी उपलब्ध झाली आहे. वीज जोडण्यांची संख्या वाढण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारकांना समाविष्ट केले जाईल, असे मार्गदर्शन केले.
आदिवासी नृत्याने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. सुमारे ४० मिनीटे मुख्यमंत्र्यांनी मामा तलाव, विहीर, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, रस्ते आदी कामांचा आढावा घेतला. उपस्थितांचे आभार अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी मानले.
सिंचन विहिरींचा तालुकानिहाय आढावा
गडचिरोली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून सर्वाधिक ११ हजार सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. धडक सिंचन विहीर अंतर्गत मागेल त्याला पात्र लाभार्थी शेतकऱ्याला सिंचन विहीर दिली जात आहे. सिंचन विहिरींचे बांधकाम नियोजित वेळेत व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री विशेष आग्रही आहेत. आढावा बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सिंचन विहिरींच्या कामांचा तालुकानिहाय आढावा घेतला. जी कामे अजूनपर्यंत सुरू झाली नाहीत, ती कामे पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे निर्देश दिले.
घरकूल योजना व स्वच्छ महाराष्ट्र कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा. ज्या व्यक्तीचे घर कच्चे आहे, त्याला पक्के घर उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. वैयक्तिक लक्ष घालून घरकूल व स्वच्छ महाराष्ट्र या योजना अधिकाऱ्यांनी राबवाव्या, असे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले.
हत्तींच्या प्रकृतीची विचारपूस
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी सहा हत्ती आहेत. यातील जगदीश व जयमालिनी हे दोन हत्ती आलापल्ली येथे आणण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी हत्तींना स्वत:च्या हाताने गूळ व केळी चारली. त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीविषयीची चौकशी केली. वन विभागाच्या मार्फत अगरबत्ती प्रकल्प, हस्तकला शिल्प आदी प्रकल्प राबविले जात आहेत. या सर्व वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी स्टॉलला भेट देऊन वन उत्पादनांची पाहणी केली.