आश्रमशाळांतील प्रकार : आजारी विद्यार्थ्यांना जावे लागते गावी - सिकरूम कुलूपबंदच

By Admin | Updated: December 27, 2014 01:36 IST2014-12-27T01:36:54+5:302014-12-27T01:36:54+5:30

आश्रमशाळेत आजारी पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ३५ आश्रमशाळांमध्ये सिकरूमचे बांधकाम करण्यात आले आहे.

Types of Ashram Shala: The sick students have to go to the village - Sikrum lockupband | आश्रमशाळांतील प्रकार : आजारी विद्यार्थ्यांना जावे लागते गावी - सिकरूम कुलूपबंदच

आश्रमशाळांतील प्रकार : आजारी विद्यार्थ्यांना जावे लागते गावी - सिकरूम कुलूपबंदच

गडचिरोली : आश्रमशाळेत आजारी पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ३५ आश्रमशाळांमध्ये सिकरूमचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र एक वर्षाहून अधिक कालावधी लोटूनही सिकरूमचे कुलूप उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर सिकरूमचा आजारी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये कोणताही फायदा होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा गडचिरोली जिल्ह्यात विविध आजारांनी १५ हजारावर अधिक विद्यार्थी आजारी पडले आहेत. तर जवळजवळ १० ते १२ विद्यार्थ्यांचा विविध आजारांनी मृत्यू झाल्याची घटना घडली.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास विभागातर्फे गडचिरोली, भामरागड, अहेरी हे तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चालविले जातात. या तिनही प्रकल्पात ९३ शाळा आहेत. यापैकी गडचिरोली प्रकल्पात २० आश्रमशाळांमध्ये व अन्य दोन प्रकल्पात किमान १५ आश्रमशाळांमध्ये शासनाने दीड ते दोन वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर आश्रमशाळांमध्ये सिकरूमचे बांधकाम करण्यात आले. येथे आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर व एक परिचारिका यांचीही नेमणूक केली जाणार आहे, असे उभारणीच्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र आजतागायत उभारण्यात आलेल्या एकाही आश्रमशाळेतील सिकरूम सुरू करण्यात आलेली नाही. बहुतांशी आश्रमशाळांमध्ये ही सिकरूम कुलूपबंद आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आजारी अवस्थेत कसेबसे रूग्णालयात पोहोचविले जाते. यंदा एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही गावच्या आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला तर दुर्गम भागात मलेरिया व इतर साथीच्या रोगाची साथ पसरल्याने जवळजवळ १५ हजार विद्यार्थी विविध आजारांनी जिल्ह्यात ग्रस्त आहेत. काहींवर नागपुरातही उपचार सुरू आहेत. शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या या सिकरूमचा कुठेही उपयोग आरोग्य व्यवस्थेसाठी होताना दिसत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
अशी आहे आश्रमशाळेतील सिकरूम
आश्रमशाळांमध्ये त्या भागातील गावांमधील विद्यार्थी निवासी व्यवस्थेने राहतात. अनेक आश्रमशाळेत शाळेलाच लागून त्यांच्या वसतिगृहाची व्यवस्था असते. त्यामुळे या परिसरात सिकरूम उभारण्याचा कार्यक्रम आदिवासी विकास विभागाने हाती घेतला होता. शाळेत आजारी पडणाऱ्या विद्यार्थ्याला घरी न पाठविता तेथे आराम करता यावा. या उद्देशाने या सिकरूम उभारण्यात आल्या. सिकरूमध्ये खुर्च्या, टेबल, चार पलंग, औषध ठेवण्यासाठी फ्रीज, सलाईनचे स्टँड, पंखे आदी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सदर सिकरूमच्या उभारणीसाठी १० ते १२ लाख रूपयाचा खर्च प्रत्येक शाळेत करण्यात आला. जिल्ह्यात २२ आश्रमशाळांमध्ये अशा सिकरूमची उभारणी करण्यात आली. यात अनेक रूम या नक्षलग्रस्त तालुक्यातील शाळांमध्ये आहेत.

Web Title: Types of Ashram Shala: The sick students have to go to the village - Sikrum lockupband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.