लेखाच्या दोन महिला तेंदू मजुरांना मारहाण
By Admin | Updated: May 24, 2015 02:11 IST2015-05-24T02:11:11+5:302015-05-24T02:11:11+5:30
तालुक्यातील लेखा येथील काही महिला मजूर तेंदू संकलन करण्यासाठी मेंढा हद्दीतील जंगलात गेले असता, मेंढाच्या ग्रामस्थांकडून दोन महिलांना मारहाण...

लेखाच्या दोन महिला तेंदू मजुरांना मारहाण
गंभीर जखमी : पीडित महिलांची पोलीस ठाण्यात तक्रार
धानोरा : तालुक्यातील लेखा येथील काही महिला मजूर तेंदू संकलन करण्यासाठी मेंढा हद्दीतील जंगलात गेले असता, मेंढाच्या ग्रामस्थांकडून दोन महिलांना मारहाण झाल्याने सदर दोन महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ तेंदू मजुराच्या जमावाने वन परिक्षेत्र कार्यालय गाठले. तसेच या प्रकरणाबाबत धानोरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आल्याने दोन गावातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
मेंढा ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत शांताबाई महादेव मडावी (४८), सिरगो मोहन गोटा (२२) असे जखमी झालेल्या महिला मजुरांचे नावे आहेत. लेखा येथील मजुरांना तेंदू संकलन करण्यासाठी मेंढाच्या ग्रामस्थांनी विरोध केला आहे. मेंढा, लेखा व कन्हारटोला हे तिन्ही गाव लेखा ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. लेखावासीयांची दिशाभूल करून मेंढाच्या ग्रामस्थांनी तेंदू संकलन करण्याची परवानगी मिळवून घेतली. मात्र तोडलेला तेंदूपत्ता मेंढा येथील फळीवर विक्रीसाठी आणण्यात यावा, अशी अट घातली. ठरल्यानुसार लेखा येथील मजूर तेंदू संकलन करण्यासाठी जंगलात गेले. दरम्यान मेंढाच्या ग्रामस्थांनी या महिला मजुरांना अश्लिल शिविगाळ करून तसेच मारहाण करून तेंदूपत्ता तोडण्यापासून वंचित ठेवले. या प्रकारामुळे लेखा व मेंढा या दोन गावात वाद वैमनस्य निर्माण झाले आहे.
तेंदू संकलनास विरोध करून महिला मजुरांना मारहाण करणाऱ्या मेंढा येथील गणपत बाजीराव तोफा, सुरेश फागू नैताम, चरणदास देवाजी तोफा व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी लेखाचे पोलीस पाटील सुरेश उसेंडी, बावजी हलामी, मधुकर किरंगे, सुरेश वाढई, विनोद लेनगुरे, उमेश सोनुले, कालिदास मोहुर्ले, सुनिता झंजाळ, लता वाढई, लिला नैताम, विभा वाढई आदीसह लेखाच्या ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकाराची तहसीलदार धानोरा यांच्याकडेही तक्रार देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वनक्षेत्र पट्टा वितरणात दुजाभाव
मेंढा, लेखा व कन्हारटोला हे तिन्ही गाव लेखा ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहेत. पूर्व परंपरेनुसार एकाच जंगलावर तिन्ही गावांचे निस्तार हक्काची वहीवाट सुरू होती. वनाधिकार कायद्यांतर्गत मेंढा गावाने अधिकचे वनक्षेत्राचा पट्टा मिळवून घेतला. लेखा ग्रामस्थांना अत्यल्प २५४ हेक्टर आरचा वन क्षेत्राचा पट्टा मिळाला. तर मेंढा ग्रामस्थांना एक हजार ८०० हेक्टर वनक्षेत्र पट्टा मिळाला. वास्तविक पाहता मूळ गाव लेखा असताना मेंढा गावाला जादा वनहक्काचा पट्टा देण्यात आला. त्यामुळे प्रशासनाकडून दूजाभाव झाला असल्याचा आरोप लेखावासीयांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत केला आहे.