गोगावजवळ दोन ट्रकची धडक
By Admin | Updated: August 28, 2015 00:06 IST2015-08-28T00:04:05+5:302015-08-28T00:06:01+5:30
आरमोरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने गडचिरोलीकडून जाणाऱ्या ट्रकला गोगाव फाट्याजवळ धडक दिल्याने ट्रकचालक ठार,....

गोगावजवळ दोन ट्रकची धडक
एक जखमी : भिलाई येथील ट्रकचालक जागीच ठार
गडचिरोली : आरमोरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने गडचिरोलीकडून जाणाऱ्या ट्रकला गोगाव फाट्याजवळ धडक दिल्याने ट्रकचालक ठार, तर दुसरा इसम जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
आरमोरीकडून लोखंड घेऊन येणारा ट्रक रस्त्याच्या मध्यभागातून येत होता, तर गडचिरोलीकडून जाणारा ट्रक डाव्या बाजूने जात होता. मात्र आरमोरीकडून येणाऱ्या ट्रकचालकाने ट्रक वेगाने चालवून दुसऱ्या ट्रकला धडक दिली. यात गडचिरोलीकडून जाणाऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आरमोरीकडून येणाऱ्या ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या सीजी ०७ सी ३८१७ क्रमांकाच्या ट्रकला आरमोरीकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या एपी २१ वाय १८१८ या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात जोगंदरसिंग प्यारासिंग संधू (५५) रा. भिलाई (छत्तीसगड) हा ट्रकचालक जागीच ठार झाला. तर या अपघातात व्यंकटेश अयय्या वरलू रा. बिदरापाल (छत्तीसगड) हा गंभीररित्या जखमी झाला. त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूर-गडचिरोली या मुख्य मार्गावर हा अपघात झाल्याने अडपल्ली, गोगाव, गडचिरोली परिसरातील शेकडो गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यामुळे येथे गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)