जंगलाला आगी लावणारे दोघे गजाआड
By Admin | Updated: April 10, 2015 01:13 IST2015-04-10T01:13:54+5:302015-04-10T01:13:54+5:30
गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्र हे जंगलाने व्याप्त आहे. या जंगलाच्या भरवशावर उन्हाळ्यात तेंदूपत्ता हंगाम पार पाडला जातो.

जंगलाला आगी लावणारे दोघे गजाआड
घोट : गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्र हे जंगलाने व्याप्त आहे. या जंगलाच्या भरवशावर उन्हाळ्यात तेंदूपत्ता हंगाम पार पाडला जातो. या हंगामातून वन विभागाला महसूल व नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. तेंदूपत्त्याचे चांगले उत्पन्न यावे म्हणून जंगलांना आगी लावल्या जातात. आगी लावणाऱ्या दोन इसमांना घोट वन परिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने ९ एप्रिल रोजी अटक केली. या आरोपींना चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी नेण्यात आले.
आलापल्ली वन विभागांतर्गत घोट वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलाला आग (वनवणवा) आग लावणारे शिवकुमार प्रेमलाल राहांगडाले (३९) रा. मुंडीपार, ता. गोरेगाव, जि. गोंदिया व नरेंद्र सुखराम कटरे (४३) रा. दवडीपार ता. गोरेगाव, जि. गोंदिया यांना गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. राखीव जंगल असलेल्या परिसरात हे दोघेजण वणवा लावण्याचे काम करीत असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी किरण पाटील, क्षेत्रसहाय्यक गणेश लांडगे, वनरक्षक दयाराम आंधळे, एस. ए. सय्यद, डी. टी. कचलामी, कुळमेथे यांच्या पथकाला दिसून आले. सदर आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्या विरूद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१), अ, ब, क व फ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३०, ५१ व जैव विविधता अधिनियम २००२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही आरोपींची प्राथमिक चौकशी केली असता, सदर दोनही आरोपी हे तेंदूपत्ता कंत्राटदारांसाठी काम करीत असल्याचे व त्यांनी सांगितल्यानुसार आगी लावण्याचे काम करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, सहाय्यक वन संरक्षक (तेंदू) दीपक तिरपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील करीत आहेत. एकूण ५० हेक्टर जंगलाला आग लावण्यात आली, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. (वार्ताहर)