कोसमीत आठ वर्गांसाठी दोनच शिक्षक
By Admin | Updated: July 1, 2017 01:26 IST2017-07-01T01:26:36+5:302017-07-01T01:26:36+5:30
तालुक्यातील कोसमी क्रमांक १ या गावात पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कोसमीत आठ वर्गांसाठी दोनच शिक्षक
बीडीओंना निवेदन : आंदोलनालाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील कोसमी क्रमांक १ या गावात पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेत दोनच शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी कोसमी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोसमी हे परिसरातील मोठे गाव आहे. बाजूच्या गावातील विद्यार्थीही या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. शिक्षण विभागाने मागील वर्षी तीन शिक्षकांची या शाळेत प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात आली होती. त्यांना २९ एप्रिल रोजी भारमुक्त करण्यात आले. त्यांच्याऐवजी नवीन शिक्षकांची नेमणूक यावर्षी करण्यात आली नाही. शिक्षकांच्या मागणीबाबतचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला व सदर ठराव शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
आठ वर्गांसाठी केवळ दोनच शिक्षक सांभाळावे लागत आहे. म्हणजेच एका शिक्षकाला चार वर्ग सांभाळावे लागत आहे.
याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होण्याची शक्तता आहे. त्यामुळे तीन शिक्षकांची तत्काळ नेमणूक करावी अन्यथा विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा इशारा पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी दिला आहे. याबाबत संवर्ग विकास अधिकारी यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून शिक्षकांची पदे भरण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना दिले आहे.
कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांना वर्ग सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील वर्षीसुद्धा रिक्तपदे होती. ती डेप्युटेशनने भरण्यात आली.