एकाच प्रस्तावावर दोन रस्ते
By Admin | Updated: December 4, 2015 01:42 IST2015-12-04T01:42:10+5:302015-12-04T01:42:10+5:30
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे एकाच प्रस्तावावर दोन रस्त्यांची निर्मिती करून शासनाला लाखो रूपयांना चुना लावण्यात आला आहे.

एकाच प्रस्तावावर दोन रस्ते
अंकिसातील प्रकार : ग्रामसभेत झाली चर्चा
आसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे एकाच प्रस्तावावर दोन रस्त्यांची निर्मिती करून शासनाला लाखो रूपयांना चुना लावण्यात आला आहे. त्यामुळे या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अंकिसा येथील नागरिकांकडून केली जात आहे.
अंकिसा ग्राम पंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत दहन-दफन भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे या कामास मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानुसार सदर कामाचे अंदाजपत्रक ४८/१५-१६ अ या क्रमांकाचे होते. त्याची किंमत ९ लाख ९९ हजार ५०० रूपये होती. या कामाला तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. मात्र त्यानंतर आणखी बनावट अंदाजपत्रक तयार करून १८९/१५/१६ अ या क्रमांकाचे अंदाजपत्रक बनविण्यात आले. यामध्ये १० लाख रूपये किंमतीचे काम दर्शविण्यात आले व याबाबत ग्राम पंचायत अंकिसाला कळविण्यात आले. कोणतीही मोका चौकशी किंवा स्थानिक ग्राम पंचायत सदस्य व नागरिकांचे म्हणणे विचारात न घेता, १८९/१५-१६ या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे ग्राम पंचायतीची मान्यता न घेताच बांधकाला मंजुरी मिळाल्याने नागरिकही आश्चर्यचकीत झाले आहेत.
२१ नोव्हेंबर रोजी अंकिसा ग्राम पंचायतीची सभा पार पडली. सभेत या रस्त्यांविषयीचा मुद्दा चर्चेला ठेवण्यात आला होता. सभेदरम्यान १४८/१५-१६ अ क्रमांकाचा अंदाजपत्रक योग्य असल्याचे सरपंच कविता कुडी व इतर उपस्थित नागरिकांनी मान्य केले आहे. या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असाही ठराव घेण्यात आला. (वार्ताहर)