कारमधून २ लाख ८८ हजार रूपयांची देशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:14 IST2018-12-24T22:14:38+5:302018-12-24T22:14:51+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत ‘थर्टी फर्स्ट’साठी चोरट्या मार्गाने दारूची आयात सुरू झाली आहे. अशाच एका कारमधून शहरात आलेल्या दारूला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यातील २ लाख ८८ हजार रुपयांची दारू व ४ लाख ५० हजार रुपयांचे वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई सर्वोदय वॉर्डातील बेसिक शाळेजवळ सोमवारी करण्यात आली.

कारमधून २ लाख ८८ हजार रूपयांची देशी दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत ‘थर्टी फर्स्ट’साठी चोरट्या मार्गाने दारूची आयात सुरू झाली आहे. अशाच एका कारमधून शहरात आलेल्या दारूला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यातील २ लाख ८८ हजार रुपयांची दारू व ४ लाख ५० हजार रुपयांचे वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई सर्वोदय वॉर्डातील बेसिक शाळेजवळ सोमवारी करण्यात आली.
गडचिरोली शहरात दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांना प्राप्त झाली. त्यामुळे त्यांच्या पथकातील हवालदार हरीदास राऊत, नापोशि थामदेव कोहपरे यांनी बेसीक शाळेजवळ सापळा रचला. एमएच ४८ ए ५४२० क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता वाहनात सुमारे ३६ देशी दारूचे बॉक्स आढळून आले. त्यामध्ये एकूण ३ हजार ६०० सीलबंद निपा होत्या. त्याची एकूण किंमत २ लाख ८८ हजार रुपये आहे. १६ हजार किमतीचे चार मोबाईलसुध्दा वाहनात आढळले.
पोलीस आल्याची चाहूल लागताच वाहन चालक व वाहनातील इतर दोघांनी वाहन ठेवून पळ काढला. पोलिसांनी माहिती काढली असता, मोहसीन अली, अमिर खान, शैलेश रापल्लीवार रा. रामनगर गडचिरोली हे वाहनात होते, अशी माहिती त्यांना प्राप्त झाली. या तिघांविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित पार्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. ही बाब लक्षात घेऊन दारू पुरवठादारांनी शहरात दारू आणली होती. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पडला. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.