दोन लाख मच्छरदान्या पोहोचल्या
By Admin | Updated: October 19, 2016 02:18 IST2016-10-19T02:18:16+5:302016-10-19T02:18:16+5:30
हिवताप रोगाबाबत संवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल, मागास गडचिरोली जिल्ह्याला यंदा प्रथमच मच्छरदान्यांचा मोठा साठा उपलब्ध झाला आहे.

दोन लाख मच्छरदान्या पोहोचल्या
वितरणाचे नियोजन अंतिम टप्प्यात : हिवताप निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
गडचिरोली : हिवताप रोगाबाबत संवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल, मागास गडचिरोली जिल्ह्याला यंदा प्रथमच मच्छरदान्यांचा मोठा साठा उपलब्ध झाला आहे. तब्बल २ लाख २४ हजार ७५० मच्छरदान्या जिल्हा हिवताप व जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या आहेत. सदर मच्छरदान्या वाटपाबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने हिवताप निर्मूलनासाठी कंबर कसली असून त्या दृष्टीने सेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व दुर्गम भागात मच्छरदानीचे वाटप करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात दोन ते तीन महिन्यांपूर्वी हिवतापाचा प्रकोप वाढला होता. परिणामी त्यावेळी कोरचीचे ग्रामीण रुग्णालय वाढत्या रुग्णसंख्येने हाऊसफूल झाले होते. या उपरही कोरची तालुक्यात हिवतापाचे अनेक बळी गेले. त्यावेळी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली होती. त्याच दरम्यानच्या काळात अहेरी उपविभागाच्या गावांमध्येही हिवतापाची साथ वाढली होती. नागरिकांकडून ओरड सुरू झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागात विशेष आरोग्य शिबिर लावण्यात आले होते. तसेच आरोग्य यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांनी हिवताप प्रभावित गावांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात मच्छरदान्या उपलब्ध देण्यात याव्या, अशी मागणी पत्रान्वये जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात वारंवार पाठपुरावाही केला. राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यासाठी २ लाख २४ हजार ७५० मच्छरदान्या उपलब्ध झाल्या आहेत.
केंद्र शासनाकडून जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला १ लाख १० हजार तर सहसंचालक कार्यालय (हिवताप, हत्तीरोग, जलजन्य रोेग) पुणे यांच्यामार्फत १२ हजार ७५० मच्छरदान्या उपलब्ध झाल्या आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हिवताप निर्मूलनासाठी यंदा १ लाख २ हजार मच्छरदान्या खरेदी केल्या आहेत. सदर मच्छरदान्या वाटपाबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत जिल्ह्याच्या बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर मच्छरदान्या पोहोचल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करण्यात आलेल्या १ लाख २ हजार मच्छरदान्या मलेरिया प्रभावित अहेरी, कोरची, भामरागड, एटापल्ली या चार तालुक्यातील गावांना प्रथम टप्प्यात देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात उर्वरित तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांना मच्छरदानीचे वाटप होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)