अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जखमी
By Admin | Updated: January 13, 2017 00:42 IST2017-01-13T00:42:42+5:302017-01-13T00:42:42+5:30
लाखांदूर मार्गावर देसाईगंज शहरापासून दोन किमी अंतरावर धानाने भरलेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात

अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जखमी
देसाईगंज : लाखांदूर मार्गावर देसाईगंज शहरापासून दोन किमी अंतरावर धानाने भरलेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८.४५ वाजता घडली. या अपघातात तीन इसम किरकोळरित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देसाईगंज ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.
देसाईगंज येथील धानगंजातून तालुक्यातील सावंगी येथील हरदेव राईसमिलमध्ये ट्रक क्रमांक एमएच ३३-४११७ ने धान वाहून नेत असताना ट्रकच्या चाकाचे पट्टे तुटले व या अपघातात ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेला नरेश धनू पोवनकार (४०) रा. आमगाव हा ट्रकखाली दबून जागीच ठार झाला. ट्रकच्या मागच्या भागात बसलेला ईश्वर दिघोरे याला गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा दुपारी मृत्यू झाला. चालक नंदकिशोर रामचंद्र गोटे याला पोलिसांनी अटक केली असून या अपघातात ट्रकवरील हमाल रामू पिलारे (३५) रा. एकलपूर, गोवर्धन कुथे (३५) रा. सोनी जि. भंडारा, भागवत दांभीरकर रा. चपराळ जि. भंडारा हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देसाईगंज रूग्णालयात उपचार सुरू आहेत. धान गंजातून १३० पोत्यांनी भरलेला ट्रक हमालासह सावंगीकडे जात असताना चालकाशी ओळख असलेला नरेश हा आमगावपर्यंत जाण्यासाठी जेजानी पेट्रोलपंपावरून ट्रकमध्ये बसला होता. मात्र त्याचा काही अंतरावरच दुर्दैवी मृत्यू झाला, हे विशेष. (वार्ताहर)