अमडेली गावातील दोन घरे जळून खाक
By Admin | Updated: April 10, 2016 01:29 IST2016-04-10T01:29:26+5:302016-04-10T01:29:26+5:30
तालुकास्थळापासून १८ किमी अंतरावर असलेल्या अमडेली येथील दोन घरांना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागल्याने दोन्ही घरे जळून खाक झाले.

अमडेली गावातील दोन घरे जळून खाक
कुटुंबीय अडचणीत : पंचनामा करण्यास महसूल विभागाची दिरंगाई
सिरोंचा : तालुकास्थळापासून १८ किमी अंतरावर असलेल्या अमडेली येथील दोन घरांना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागल्याने दोन्ही घरे जळून खाक झाले.
गावडे मासा कुल्ले व गावडे कारे कुल्ले असे घर जळालेल्या घर मालकांची नावे आहेत. दुपारी १२ वाजताच्या सुमारास या दोन्ही घरांना अचानक आग लागली. आग विझविण्याचा गावातील नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे दोन्ही घरे जळून खाक झाली.
या आगीमध्ये ३० ते ३५ क्विंटल धान, मजुरीची रक्कम व घरातील संपूर्ण सामग्री आगीत जळून खाक झाली. या घटनेत दोन्ही घर मालकांचे तीन ते चार लाख रूपयांचे नुकसान झाले.
घराला आग लागल्याची माहिती सिरोंचा तहसीलदारांना देण्यात आली होती. मात्र २४ तासांचा कालावधी उलटूनही पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसीलदार या ठिकाणी पोहोचले नव्हते. प्रशासनाच्या या दिरंगाईबाबत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोन्ही कुटुंब मजुरी करून जीवन जगणारे आहेत. अशातच घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे वेळेवर अन्नधान्य कसे खरेदी करावे, असा प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. महसूल विभागाने गावडे कुटुंबाला तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)