दोन कोटी भरले, वीज जोडणी नाही
By Admin | Updated: June 18, 2016 00:46 IST2016-06-18T00:46:54+5:302016-06-18T00:46:54+5:30
विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविणेबाबतच्या योजनेतून कृषी विभागाने आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना कृषी पंप वाटप केले.

दोन कोटी भरले, वीज जोडणी नाही
दोन वर्षे उलटली : अडीच हजारांवर आदिवासी शेतकरी सिंचन सुविधेच्या प्रतीक्षेतच
दिलीप दहेलकर गडचिरोली
विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविणेबाबतच्या योजनेतून कृषी विभागाने आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना कृषी पंप वाटप केले. त्यानंतर वीज जोडणीसाठी डिमांडच्या स्वरूपात महावितरणकडे २ कोटी १ लाख रूपये ९१ हजार रूपये अदा केले . मात्र गेल्या दोन वर्षांपासून तब्बल २ हजार ५१४ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या आहेत. याच कार्यालयामार्फत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी पंप वाटप व कृषी जोडणीची योजना हाती घेण्यात आली आहे. कृषी विभागाने सन २०१३-१४ मध्ये या योजनेंतर्गत १ हजार ३७५ व सन २०१४-१५ मध्ये १ हजार ९१७ असे एकूण ३ हजार २९२ लाभार्थ्यांना कृषी पंप व वीज जोडणीसाठी पात्र ठरविले. यापैकी महावितरणने केवळ ७७८ शेतकरी लाभार्थ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी दिली आहे. तसा अहवाल महावितरणकडून जानेवारी २०१६ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. कृषी विभागाने १ हजार ९१७ लाभार्थ्यांच्या कृषी पंपांच्या जोडणीसाठी १ कोटी ३५ लाख ९० हजार व १ हजार ३७५ लाभार्थ्यांचे ६६ लाख असे एकूण २ कोटी १ लाख ९१ हजार रूपये डिमांडच्या स्वरूपात महावितरणाकडे वर्ग केले आहे. मात्र कृषी पंपांना वीज जोडणी देण्याच्या कामात गती नसल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या वतीने आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना १०० सवलतीवर कृषी पंप व वीज जोडणी देण्याची ही योजना आहे. या संदर्भात गडचिरोली वीज वितरण विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता अशोक मस्के यांना विचारणा केली असता, याबाबतची सविस्तर माहिती दोन दिवसानंतर देतो, असे त्यांनी लोकमतला सांगितले.
कृषी विभागाकडून अनेकदा पाठपुरावा
विदर्भ विकास कार्यक्रमाच्या योजनेतून कृषी पंप वितरित केलेल्या आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याची कार्यवाही महावितरणने लवकर करावी, याकरिता कृषी विभागाने महावितरणच्या कार्यालयाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. मात्र महावितरणकडून कृषी पंपाच्या वीज जोडणीत अनेक अडचणी पुढे केल्या जात आहेत.
यावर्षीच्या खरीप हंगामात उपयोग होणार काय?
कृषी पंपाना वीज जोडणी देण्यात महावितरणकडून प्रचंड दिरंगाई होत आहे. यंदाचा खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकरी बी-बियाणे खरेदीच्या कामात लागला आहे. यावर्षी धान पिकाच्या लागवडीनंतर समाधानकारक पाऊस न झाल्यास आदिवासी शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या साहाय्याने शेतीला पाणी पुरवठा करावा लागणार नाही. मात्र खरीप हंगामातील पीक अंतिम टप्प्यात येईपर्यंत महावितरणकडून उर्वरित अडीच हजारवर लाभार्थ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम पूर्ण होईल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महावितरणच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा
कृषी विभागाकडून शासकीय योजनेतून कृषी पंप मिळालेल्या शेतकऱ्यांनी आज ना उद्या महावितरणकडून कृषीपंपाला वीज जोडणी करून देण्यात येईल, अशी आशा केली होती. मात्र वर्ष, दोन वर्षाचा कालावधी उलटूनही महावितरणकडून वीज जोडणीचा पत्ता नसल्याने अनेक लाभार्थी शेतकरी महावितरणच्या कार्यालयात चकरा मारीत असल्याचे दिसून येते.