गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरलेले दोन बॉम्ब नष्ट; घातक शस्त्रे, साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 19:40 IST2023-03-23T19:39:29+5:302023-03-23T19:40:05+5:30
Gadchiroli News सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचविण्यासाठी घातपाती कट रचून नक्षल्यांनी मोठा गेमप्लॅन आखला होता; परंतु पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून हा कट उधळून लावला.

गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरलेले दोन बॉम्ब नष्ट; घातक शस्त्रे, साहित्य जप्त
गडचिरोली : सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचविण्यासाठी घातपाती कट रचून नक्षल्यांनी मोठा गेमप्लॅन आखला होता; परंतु पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून हा कट उधळून लावला. दोन बॉम्ब जागीच नष्ट केले, तर इतर घातक शस्त्रे, साहित्य जप्त केले. ही कारवाई भामरागड येथे करण्यात आली.
फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी (टेक्निकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) कालावधी साजरा करतात. यादरम्यान शासनविरोधी घातपाती कारवायांसाठी विविध प्रकारची शस्त्रे व स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो. नक्षलवाद्यांनी शासनविरोधी कारवायांसाठी टीसीओसी मोहिमेेअंतर्गत मोठी रणनीती आखली होती.
या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर होती. २२ मार्च रोजी भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिसांनी विशेष अभियान राबविले. नेलगुंडा गावास भेट देऊन जवान बाहेर पडत होते. यावेळी गोंगवाडा रोडवर एक क्लेमोर माईन्स, महाकापाडी रोडवर एक व महाकापाडी पगदंडीवर एक कुकर बॉम्ब मिळाला. यासोबतच एक बॅटरी, एक क्लेमोरसाठी वापरलेला ३ फुटांचा लोखंडी पाईप व इलेक्ट्रिक वायरचे ७० मीटर लांबीचे तीन बंडल आदी साहित्य हस्तगत करण्यात आले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक व बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या जवानांनी ही कारवाई केली.
दोन बॉम्ब केले जागीच नष्ट
दोन वेगवेगळ्या रस्त्यांवर मिळालेले दोन कुकर बॉम्ब व एक क्लेमोर माईन्स हे बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने सुरक्षितरीत्या नष्ट करण्यात आले. पोलिस ठाण्यात याची नोंद असून, नक्षल्यांचा शोध सुरू आहे.