वाघाच्या कातड्यासह दाेघांना अटक, एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाली शिकार
By गेापाल लाजुरकर | Updated: November 29, 2023 21:48 IST2023-11-29T21:48:18+5:302023-11-29T21:48:29+5:30
कसून तपासणी केली असता एका प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळले.

वाघाच्या कातड्यासह दाेघांना अटक, एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाली शिकार
गडचिराेली : तालुका मुख्यालयातील जीवनगट्टा मार्गावर मंगळवार २८ नाेव्हेंबर राेजी दुचाकीने रात्री संशयास्पद फिरणाऱ्या दाेघांची वन कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांच्याकडून मृत वाघाचे कातडे प्राप्त झाले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाेन्ही आराेपींना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे याच परिसरात वाघाची शिकार झाली तर नसावी ना, यासह अनेक शंका उपस्थित हाेत आहेत.
एटापल्लीचे प्रभारी वनपरिश्रेत्र अधिकरी सी.सी. भेडके हे वन कर्मचाऱ्यांसह गस्तीवर असताना मंगळवारी रात्री एटापल्लीपासून दाेन किमी अंतरावर जीवनगट्टा मार्गावर एका माेटारसायकलवर दाेन व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांच्यावर संशय आल्याने वनाधिकाऱ्यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मोटार सायकलचा वेग वाढवून पळ काढला. सदर माेटारसायकलचा पाठलाग वनकर्मचाऱ्यांनी करीत त्यांना पकडले. त्यांची कसून तपासणी केली असता एका प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळले.
तेव्हा वन कर्मचाऱ्यांनी दाेन्ही आराेपींना ताब्यात घेतले व वनकायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. एक आराेपी एटापल्ली तर दुसरा आराेपी वासामुंडी येथील आहे. या घटनेचा अधिक तपास भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक शैलेशकुमार मीणा, सहायक वनसंरक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात एटापल्लीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सी.सी. भेडके करीत आहे.