अडीच कोटी थकले
By Admin | Updated: July 7, 2014 23:33 IST2014-07-07T23:33:36+5:302014-07-07T23:33:36+5:30
दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या मार्फतीने जिल्ह्यात सुमारे सहा कोटी रूपयाची कामे करण्यात आली. मात्र यापैकी जवळपास अडीच कोटी रूपयांचा निधी प्राप्त न झाल्याने

अडीच कोटी थकले
ग्रामपंचायत अडचणीत : दलित वस्ती सुधार योजना
गडचिरोली : दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या मार्फतीने जिल्ह्यात सुमारे सहा कोटी रूपयाची कामे करण्यात आली. मात्र यापैकी जवळपास अडीच कोटी रूपयांचा निधी प्राप्त न झाल्याने ग्रामपंचायती अडचणीत आल्या आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी ४२० दलित वस्त्या होत्या. मात्र त्यामध्ये वाढ होऊन आता जिल्ह्यात ५७२ दलित वस्त्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षापासून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामे करण्यासाठी पुरेसा निधी प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे दलित वस्त्यांची अवस्था दयनिय झाली होती. मागील वर्षीच्या आर्थिक वर्षात सुमारे ६ कोटी रूपयाच्या कामाला मंजुरी प्रदान करण्यात आली. या अंतर्गत गावातील दलित वस्ती योजनेंतर्गतच्या निधीतून हातपंप, काँक्रीटीकरण आदी बांधकामे करण्यात आली. सदर बांधकामे जवळपास नोव्हेंबर ते डिसेंबरमध्येच पूर्ण झाली. या योजनेंतर्गत साडेतीन लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला. या निधीचे ६० टक्के व ४० टक्के अशा दोन हप्त्यात वाटप करण्यात येते. या निधीतून ६० टक्केचा पहिला हप्ता वाटप करण्यात आला. त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायतींनी अगोदर बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र सादर केले. त्यांना दुसरा ४० टक्केचाही हप्ता देण्यात आला. मात्र ज्या ग्रामपंचायतींनी कामे उशीरा केली व काम झाल्याचे प्रमाणपत्र उशिराने सादर केला. त्या ग्रामपंचायतीला निधी संपल्याने दुसरा ४० टक्केचा हप्ता प्राप्त झाला नाही.
सदर कामे ग्रामपंचायतीच्या मार्फतीनेच करावयाची असली तरी काही ग्रामपंचायतींनी मात्र ही कामे कंत्राटदाराच्याही मार्फतीने केली आहेत. बांधकामासाठी लागणारे संपूर्ण साहित्य ग्रामपंचायतींनी उदारवाडी आणली. पाच महिने लोटूनही पैसा न मिळाल्याने दुकानदारांनी ग्रामसेवक व सरपंचांकडे पैशासाठी तगादा लावणे सुरू केले आहे. त्याचबरोबर या कामावर काम करणाऱ्या मजुरांनीही मजुरीसाठी त्रास देणे सुरू केले आहे. मात्र निधीच नसल्याने पैसे कुठून द्यावे, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. ग्रामसेवक याबद्दल जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात वेळोवेळी येऊन विचारणा करीत आहेत. समाज कल्याणमधील कर्मचारी शासनाकडूनच निधी उपलब्ध झाला नसल्याने आपण कुठून पैसे देणार असा प्रतिप्रश्न करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)