वाहनासह सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 01:39 IST2017-03-09T01:39:47+5:302017-03-09T01:39:47+5:30
चामोर्शी येथे अवैधरीत्या दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे

वाहनासह सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गडचिरोली : चामोर्शी येथे अवैधरीत्या दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डोंगरगाव-चामोर्शी मार्गावर गस्त लावून बुधवारी पहाटे २.४५ वाजताच्या सुमारास वाहनासह ८ लाख ३२ हजार २४० रूपयांची दारू जप्त केली.
डोंगरगाव- चामोर्शी मार्गावर गस्त लावली असताना महिंद्रा पीकअप वाहन येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन भरधाव वेगाने चामोर्शी मार्गे पळविण्यात आले. या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केला असता, चामोर्शी येथील पेट्रोलपंप आवारात सदर वाहन उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहन क्रमांक एम. एच. ३३ जी. २३८१ ची तपासणी केली असता, २ लाख ८२ हजार २४० रूपये किमतीच्या २ हजार ३५२ सिलबंद निपा आढळून आल्या. तसेच ५ लाख ५० हजार रूपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. सदर माल कोरची येथील पुरवठादार निर्मल धमगाय याचे असल्याचे वाहनचालक श्रवण जमकातन याने सांगितले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, इंगळे, बोरकर, दुर्गे, वाळके, नरोटे, चव्हारे, मुंढे, चहारे यांनी केली.