धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत
By Admin | Updated: October 25, 2014 01:21 IST2014-10-25T01:21:57+5:302014-10-25T01:21:57+5:30
दिवाळी सण लोटून गेला. परंतु गडचिरोली जिल्ह्यात राज्य शासनाचे एकही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे हलके धान निघण्यास सुरूवात झाली आहे.

धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत
गडचिरोली : दिवाळी सण लोटून गेला. परंतु गडचिरोली जिल्ह्यात राज्य शासनाचे एकही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे हलके धान निघण्यास सुरूवात झाली आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे धान निघताच तत्काळ विकण्याची तयारी करीत आहे. शासनाचे खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात हा धान शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात धान हेच प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात सर्व जातीचा धान उत्पादन केला जातो. गडचिरोली जिल्ह्यात हलक्या जातीचा धान लावणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठ्या संख्येत आहे. दिवाळीच्या तोंडावर हा धान काढणीसाठी तयार होतो. यंदाही उशीरा पाऊस आला असला तरी अनेक शेतकऱ्यांना धान काढणे सुरू झाले आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकरी शेतातूनच निघालेला धान थेट विक्रीसाठी नेत आहे. जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत धान खरेदी केली जाते. परंतु राज्य शासनाचे एकही धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.
शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसल्याने व्यापारीही पडत्या भावाने धानाची खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजकीय पक्ष या प्रश्नावर मुंग गिळून आहे. निवडणुका पार पडल्यामुळे अनेकांना पराभव वाट्याला आला. त्यामुळे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आहे. नव्या शासनाचा अजून शपथविधीही झालेला नाही. आदिवासी विकास विभागाने तत्काळ धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.