तूर डाळ गरिबांच्या भोजनातून गायब
By Admin | Updated: March 19, 2015 01:28 IST2015-03-19T01:28:40+5:302015-03-19T01:28:40+5:30
तूर डाळीच्या अत्यल्प उत्पादनामुळे डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत़ दोन महिन्यांपूर्वी ५५ ते ७० रूपये प्रति किलोप्रमाणे मिळणारी तुरीची डाळ ९० ते १०० रूपयांपर्यंत पोहोचली आहे़ ....

तूर डाळ गरिबांच्या भोजनातून गायब
महेंद्र चचाणे देसाईगंज
तूर डाळीच्या अत्यल्प उत्पादनामुळे डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत़ दोन महिन्यांपूर्वी ५५ ते ७० रूपये प्रति किलोप्रमाणे मिळणारी तुरीची डाळ ९० ते १०० रूपयांपर्यंत पोहोचली आहे़ पावसामुळे यावर्षी तुरीचे पीक खराब झाल्याने तूर डाळीचे दर प्रचंड वाढले आहेत. पुढेही दरवाढीची शक्यता असल्याने तुरीच्या डाळीचे वरण गरिबांच्या ताटातून गायब होण्याची चिन्हे आहेत़
सध्या चपातीची संगत डाळीने सोडली आहे़ मार्चमध्ये तूर, चना, वाटाणा, मसूर, मूग आदी पीक बाजारात येईल, परंतु गारपिटीमुळे या मालाला प्रचंड प्रमाणात तडाखा बसला आहे. त्यामुळे उत्पन्न हवे तसे मिळणार नाही व नुकसानीमुळे तुरीही बऱ्याच प्रमाणात खराब झाल्या आहेत. त्यामुळे त्याला चांगला भाव मिळणे कठण्ीा आहे.
मागील वर्षी तुरीचे उत्पादन चांगले झाले़ त्यामुळे तुरीचे भाव आटोक्यात होते़ मात्र अत्यल्प उत्पादनामुळे दोन महिन्यांतच तुरीच्या डाळीने शंभरी गाठायची तयारी दाखविली आहे़ ठोक बाजारात एक महिन्यातच तुरीचे दर पाच हजारावरून सहा हजार शंभर रुपयांवर गेले. कर्नाटक तूर ६ हजार ३०० रुपये आणि बर्मा येथील आयातीत तूर सहा हजारांवर असून वाहतुकीच्या खर्चासह प्रतिक्विंटल दर ६ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहेत, अशी माहिती स्थानिक ठोक धान्य व्यापाऱ्यांनी दिली आहे़ त्यामुळे बाहेरून आलेल्या मालावर परिणाम पडलेला आहे़ व्यापारही प्रभावित झाला आहे.