३०५४ चा निधी वळविण्याचा प्रयत्न टळला
By Admin | Updated: September 13, 2015 01:24 IST2015-09-13T01:24:16+5:302015-09-13T01:24:16+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील विकास कामांसाठी देण्यात येणारा ३०५४ चा निधी जि.प. कडून राज्य शासनाकडे वळता करण्याचा प्रयत्न जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत झाला होता.

३०५४ चा निधी वळविण्याचा प्रयत्न टळला
जि.प. अध्यक्ष कडाडले : नियोजन बैठक
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील विकास कामांसाठी देण्यात येणारा ३०५४ चा निधी जि.प. कडून राज्य शासनाकडे वळता करण्याचा प्रयत्न जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत झाला होता. या बाबीला पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी समर्थन दर्शविले होते. मात्र या सभेतच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी हा निधी राज्य शासनाकडे वळता करण्याच्या बाबीवर आक्षेप घेतला. जिल्हा परिषदेच्या हक्काचा पैसा राज्य शासनाकडे वळता करता येणार नाही, अशी ठामपणे भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी या निधी अंतर्गत कामाचे नियोजन तयार नसल्याची बाब उपस्थित केली. त्यावर कुत्तरमारे यांनी गेल्यावेळच्या नियोजनाबाबत आपण बोलत आहात. हे काम सुरू झालेले आहे. नवीन कामांचे नियोजन करण्यासाठी गरज भासल्यास जि.प.ची विशेष सर्वसाधारण सभा बोलावून आपण नियोजन करून घेऊ, असेही सभागृहात सांगितले. मात्र ३०५४ चा निधी हा जि.प.चा हक्काचा पैसा असल्याने याला राज्याकडे वळता करण्याच्या प्रकारावरच त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे हा निर्णय टळला. (जिल्हा प्रतिनिधी)